क्रीडा : हवा आहे एक मसिहा! | पुढारी

क्रीडा : हवा आहे एक मसिहा!

विवेक कुलकर्णी

1983 मधील कपिलदेव असेल किंवा 2007 मधील महेंद्रसिंग धोनी, हे त्या त्या संघातील जणू एक मसिहा होते. ज्या ज्या वेळी संघ अडचणीत आला, त्या त्या वेळी ते संघाच्या मदतीला धावून आले. फक्त धावूनच आले नाहीत तर त्यांनी संघाची नौका अगदी विजयापार नेली. यंदाच्या विश्वचषकासाठी 142 कोटी भारतीयांच्या अपेक्षा ज्यावर टिकून आहेत, त्या 15 जणांचा संघ जरूर निवडण्यात आला. पण, या संघात विश्वचषक जिंकून देणारा कपिल किंवा धोनीसारखा एखादा मसिहा आहे का, हे प्रत्यक्ष स्पर्धेतच सुस्पष्ट होणार आहे.

नजर नजर में हर नजर में एक नजर की तलाश थी, नजर तो मिल गयी, लेकिन ये नजर, वो नजर नही थी, जिस नजर को उस नजर की तलाश थी! भारतातच होणार्‍या आयसीसी वन डे वर्ल्डकपसाठी भारताचा 15 सदस्यीय संघ जाहीर झाला तेव्हा कदाचित भारतीय क्रीडा शौकिनांची भावना यापेक्षा वेगळी नसेल. संघात एकही एक्स फॅक्टरचा खेळाडू नाही, ऋषभ पंत नसल्याने पहिल्या पसंतीचा यष्टीरक्षक के. एल. राहुल की ईशान किशन याबद्दल संभ्रमावस्था. संघात एकही ऑफस्पिनर नाही, मे महिन्यानंतर एकही सामना न खेळलेल्या के.एल. राहुलला संधी… अशा अनेक त्रुटी यात प्रथमदर्शनी चर्चेत आल्या. शिवाय, अशा महत्त्वाच्या स्पर्धेत काही पोझिशन्सवर संभ्रमावस्था कायम ठेवणे, हा व्यवस्थापनाचा शिरस्ताच झाला आहे का, असा प्रश्नही यानिमित्ताने उभा ठाकला.

आता काही जमेच्या बाजूही पाहूया. संघात निवडलेल्या 7 फलंदाजांनी वन डेमध्ये आजवर 88 शतके व 29 हजारपेक्षा धावा फटकावल्या आहेत, 4 गोलंदाजांनी आतापर्यंत 450 बळी व 26 वेळा डावात 4 किंवा त्याहून अधिक बळी घेतले आहेत आणि त्याचप्रमाणे 4 अष्टपैलूंनी 5858 धावा व 388 बळी, असे योगदान दिले आहे. विराटचा हा चौथा तर रोहित, शमी यांचा हा तिसरा वर्ल्डकप आहे. यानंतरचा पुढील विश्वचषक 2027 मध्ये होईल आणि तोवर विराट व रोहित निवृत्तीच्या आसपास किंवा त्या पल्याडही असू शकतात. आता संघातील काही वादग्रस्त निवडीबाबत. तसे पाहता, के.एल. राहुलला कोणत्याही परिस्थितीत संघात ठेवायचेच, असे निवड समिती व व्यवस्थापनाने कदाचित ठरवलेच होते. फक्त यासाठी त्याची तंदुरुस्ती चाचणीची प्रतीक्षा होती. या चाचणीचा अहवाल आला आणि अगदी अंतिम क्षणी संघनिवड घोषित केली गेली. आता के.एल. राहुलच्या अनुभवाबद्दल प्रश्नच येत नाही. पण, तो प्रदीर्घ कालावधीपासून मैदानापासून दूर आहे, काही गंभीर दुखापतीतून सावरत पुनरागमन करतो आहे, याचा सोयीस्कर विसर या निमित्ताने पडलेला असू शकतो. यामुळे होईल असे की, जवळपास प्रत्येक सामन्यापूर्वी के.एल. राहुलच्या फिटनेसचा आढावा घ्यावा लागेल.

तसे पाहता 1983 मध्ये भारताने कपिलच्या नेतृत्वाखाली विंडीजसारख्या तगड्या प्रतिस्पर्ध्याला चारीमुंड्या चीत करत झळाळत्या विश्वचषकावर प्रथमच आपली मोहोर उमटवली आणि त्यानंतर जवळपास प्रत्येक आयसीसी विश्वचषक स्पर्धेत भारताला जेतेपदाची स्वप्ने साहजिकच पडू लागली. यात 2011 मध्ये भारत धोनीच्या नेतृत्वाखाली पुन्हा एकदा विजेता ठरला, एकदा फायनल, चार वेळा सेमीफायनलपर्यंत पोहोचला तर काही वेळा स्पर्धेच्या बाद फेरीपूर्वीच गाशाही गुंडाळला.

आता 2019 ते 2023 या दोन विश्वचषक स्पर्धेच्या कालावधीत नेमके काय घडले, त्याचा आढावा घेऊ. इंग्लंडमधील 2019 च्या विश्वचषकानंतर कोरोनामुळे लॉकडाऊन आले आणि स्टेडियम्सना टाळे लागले. सारे काही पूर्ववत होत असताना दोन वर्षांच्या कालावधीत घाईगडबडीने दोन टी-20 विश्वचषक व 2 कसोटी चॅम्पियनशिप घेण्यात आल्या. यानंतर जो काही उरलासुरला वेळ होता त्यात आयपीएल आणि काही घटकांना खूश करण्यासाठी द्विपक्षीय मालिका घेण्यात आल्या. पण, यादरम्यान, भारताचा खेळ सांघिक असा बहरलाच नाही, ही वस्तुस्थिती आहे.

फलंदाजीचा विचार करता भारत एकमेव असा संघ आहे, जो रोहित शर्मा, शुभमन गिल व ईशान किशन असे वन डेतील तीन द्विशतकवीर मैदानात उतरवू शकतो. पण, मुळात एखाद्या सामन्यासाठी हे तिघेही एकत्रित असे खेळवले जाणार का, हा खरा प्रश्न आहे. सध्याच्या घडीला विराट कोहली हा मधल्या फळीतील एकच खेळाडू असा आहे, ज्याच्यावर अगदी सचिन तेंडुलकरप्रमाणेच आशा-अपेक्षांचे ओझे सातत्याने असते. ज्याप्रमाणे द्रविड, लक्ष्मण, गांगुली, सेहवाग असतील वा नसतील तरी सारी मदार सचिनवर असायची, त्याचप्रमाणे आता विराटची स्थिती आहे. जोवर विराट क्रीझवर असेल, तोवर दिवाणखान्यातील टीव्ही बंद होण्याचे कारण नसते, हे आजही तितकेच चपखल लागू होते.

या संघनिवडीचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे यंदा शुभमन गिल, श्रेयस अय्यर, ईशान किशन, सूर्यकुमार यादव, शार्दुल, सिराज असे थोडेथोडके नव्हे तर चक्क 6 खेळाडू प्रथमच विश्वचषक खेळतील. खरं तर धवन उशिरापर्यंत मर्यादित षटकांच्या संघात होता. त्यामुळे व्यवस्थापनाच्या प्लॅनिंगमध्ये तो समाविष्ट आहे, असेच संकेत होते. पण वर्षारंभापासून शुभमन गिल, रोहित आणि ईशान किशन यांच्यावर लक्ष केंद्रित केले गेले आणि धवन आपसूकच बाहेर फेकला गेला. सहा वर्षांपूर्वी युझवेंद्र चहल व आता कुलदीप यादवबाबतही असेच अनाकलनीय लॉजिक लावण्यात आले.

असेच काहीसे रविचंद्रन अश्विनबाबतही आहे. खरं तर अश्विन फिरकी अष्टपैलूपेक्षाही स्पेशालिस्ट ऑफस्पिनर म्हणून अधिक नावारूपास आला. त्याच्यामुळे वॉशिंग्टन सुंदर जो गोलंदाजीची सुरुवात करू शकतो आणि गरजेप्रमाणे वरच्या क्रमांकावर फलंदाजी करू शकतो, तोही झाकोळला गेला. या पार्श्वभूमीवर, रोहित पत्रकार परिषदेत काय म्हणाला होता, ते लक्षवेधी आहे. तो म्हणाला होता, ‘आम्ही वर्ल्डकपसाठी निवडलेल्या संघात 3 अष्टपैलू आहेत.’

या संघात बुमराह, कुलदीप, शमी व सिराज असे चारच स्पेशालिस्ट गोलंदाज आहेत व इंग्लंड, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड व अगदी पाकिस्तानसारख्या प्रतिस्पर्ध्यांशी दोन हात करताना भारताचा विविध आघाड्यांवर कस लागला तर यात आश्चर्याचे कारण असणार नाही. अन्य संघांशी तुलना करता ऑस्ट्रेलियाने या स्पर्धेसाठी तीन फिरकीपटू निवडले तर इंग्लंडच्या संघात किमान सहा खेळाडू असे आहेत, जे फलंदाजी व गोलंदाजी या दोन्ही आघाड्यांवर हुकमी योगदान देऊ शकतात. भारताने निवडलेल्या संघाचे सरासरी वय 29.4 इतके आहे, याचाही थोडाफार फरक निश्चितच पडू शकतो.

आता वस्तुस्थिती ही आहे की, भारताने प्रदीर्घ कालावधीपासून सांघिक खेळच साकारलेला नाही. प्रत्येक वेळी दोन-चार खेळाडूंचा वैयक्तिक खेळ बहरला. पण, त्यात एकजिनसीपणाचा अभाव होता, असेच अनुभवास येत राहिले. आताही निवडलेला 15 जणांचा संघ जगज्जेतेपदासाठी प्रबळ दावेदार आहे. पण, तो फक्त कागदावर! हेच जेतेपद एकापेक्षा एक कसलेल्या व्यावसायिक संघांना धूळ चारत प्रत्यक्षात खेचून आणायचे असल्यास भारताला फलंदाजी, गोलंदाजी व क्षेत्ररक्षण या तिन्ही आघाड्यांवर सर्वस्व पणाला लावावे लागेल, ही काळ्या दगडावरची रेघ असणार आहे.

Back to top button