अहमदनगर : रेकॉर्डवरील गुन्हेगारांसाठी अ‍ॅक्शन प्लॅन; पोलिस महानिरीक्षक बी.जी.शेखर | पुढारी

अहमदनगर : रेकॉर्डवरील गुन्हेगारांसाठी अ‍ॅक्शन प्लॅन; पोलिस महानिरीक्षक बी.जी.शेखर

अहमदनगर; पुढारी वृत्तसेवा : आगामी काळ सणोत्सवाचा असल्याने कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी रेकॉर्डवरील गुन्हेगारांसाठी अ‍ॅक्शन प्लॅन तयार करण्यात आला असून, गुन्हेगारांवर कठोर कारवाया करण्याचे आदेश पोलिस अधिकार्‍यांना देण्यात आल्याची माहिती विशेष पोलिस महानिरीक्षक बी.जी.शेखर यांनी पत्रकार परिषदेत दिली. मोक्का, एमपीडीए, तडीपारी सारख्या कारवाया करण्यास सुरूवात केली असून, धार्मिक तेढ निर्माण करणार्‍यांना सोडणार नसल्याचा गर्भीत इशारा बी.जी.शेखर यांनी दिला.

गणेशोत्सव व इर्द-ए-मिलाद या दोन्ही सणाच्या पार्श्वभूमीवर आढावा घेण्यासाठी बी.जी.शेखर यांच्या उपस्थितीत शुक्रवारी (दि.8) वरिष्ठ अधिकार्‍यांची बैठक पार पडली. त्यानंतर शेखर यांनी माध्यमांसोबत संवाद साधला. आगामी सणोत्सवाच्या पार्श्वभूमीवर रेकॉर्डवरील गुन्हेगारांवर मोक्का, एमपीडीए, तडीपारी सारख्या कठोर कारवाया करण्यात येत आहेत. त्यासोबतच छेडछाडीच्या घटना घडू नये, यासाठी दामिनी, बीडीएस पथके गठीत करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.

जिल्ह्यात चोरट्या मार्गाने अवैध हत्यारे दाखल होण्याचे प्रमाण मोठे आहे. अनेक गुन्ह्यांमध्ये अवैध शस्त्रे आढळून आली. त्यामुळे अवैध शस्त्रे बाळगणार्‍यांची गोपनीय माहिती काढून संबंधितांवर कारवाया करण्यात येत आहेत. जोनवारी 2023 पासून नगरमधून 26 गावठी कट्टे जप्त करण्यात आले. तसेच, मध्यप्रदेशातील उमरठी व सेधंवा या ठिकाणी तयार होत असलेल्या गावठी कट्ट्यांच्या कारखान्यांवर पोलिसांनी धाडी टाकून आरोपींना अटक करण्यात आल्याची माहिती बी.जी.शेखर यांनी पत्रकार परिषदेत दिली. पोलिस अधीक्षक राकेश ओला, अपर पोलिस अधीक्षक प्रशांत खैरे, सर्व उपविभागीय पोलिस अधिकारी यांच्यासह इतर पोलिस अधिकार्‍यांची यावेळी उपस्थिती होती.

पोलिस चौक्या बंद राहता कामा नये

कायदा व सुव्यवस्था योग्य रितीने हाताळता यावी, यासाठी पोलिस ठाण्याच्या हद्दीत ठरावीक अंतरावर पोलिस चौक्या आहेत. मात्र, याठिकाणी पोलिस अंमलदार हजर न राहता पोलिस चौक्यांना टाळे असते. त्यावर उपस्थित सर्व पोलिस अधिकार्‍यांना पोलिस चौक्या कोणत्याही परिस्थितीत बंद राहता कामा नये, असे आदेश बी.जी.शेखर यांनी यंत्रणेला दिलेत.

पोलिसांचा दरारा दिसू द्या!

जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्थेची परिस्थिती बिघडू नये, यासाठी अतिशय गांभीर्याने लक्ष देण्याची गरज आहे. कोणत्याही परिस्थितीत पोलिसांचा गुन्हेगारांवर धाक असला पाहिजे, कोणाच्याही दबावाला बळी न पडता पोलिसांचा दरारा दिसू द्या, असे स्पष्ट निर्देश विशेष पोलिस महानिरीक्षक बी.जी.शेखर यांनी सणोत्सवाच्या पार्श्वभूमीवर अधिकार्‍यांना दिल्याची महिती सूत्रांनी दिली.

व्हॉटस्अ‍ॅप ग्रुपमध्ये पोलिसांचे खबरी

सोशल मीडियावर एखादा कोणी आक्षेपार्ह पोस्ट टाकतो आणि त्यानंतर धार्मिक तेढ निर्माण होते. हे टाळण्यासाठी शहरासह जिल्ह्यातील सर्वच प्रकारच्या व्हॉटस्अ‍ॅप ग्रुपमध्ये पोलिसांचे खबरी असल्याची माहिती स्वतः पोलिस अधीक्षक राकेश ओला यांनी दिली. त्यामुळे कोणीही आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल केल्यास संबंधिताची कुंडली लगेच पोलिसांच्या हाती येणार आहे.

हेही वाचा

इंडियाज बेस्ट डान्सर 3 : रविना टंडनची विशेष अतिथी म्हणून उपस्थिती

रायगड: कसारा घाटाजवळ ट्रक अपघातात चालक ठार

कोल्हापूर : मराठा आरक्षणासाठी हुपरीत अर्धनग्न आंदोलन

Back to top button