‘आय फ्लू’ ने पुणेकर त्रस्त ; शहरात 13 हजार जणांना लागण | पुढारी

‘आय फ्लू’ ने पुणेकर त्रस्त ; शहरात 13 हजार जणांना लागण

पुणे : पुढारी वृत्तसेवा :  राज्यात डोळे येण्याची साथ पसरलेली असताना जिल्ह्यातही रुग्ण आढळून येत आहेत. पुणे शहरात आतापर्यंत 13 हजार 500 जणांना ’आय फ्लू’ची लागण झाली आहे. मात्र, गेल्या आठवड्याच्या तुलनेत रुग्णांची संख्या कमी होताना दिसत आहे. सध्या औंध-बाणेर आणि नगर रस्ता-वडगावशेरी या भागांमध्ये सर्वाधिक रुग्ण आहेत. वातावरणातील बदलामुळे यंदा डोळे येण्याचे प्रमाण वाढल्याचे दिसत आहे. अ‍ॅडिनो आणि एंटेरो विषाणूमुळे डोळ्यांचा संसर्ग होतो. मात्र, संसर्ग सौम्य स्वरूपाचा असतो. त्यामुळे पाच ते सहा दिवस रुग्णाला डोळे लाल होणे, सूज येणे, पापण्या चिकटणे, पाणी येणे अशी लक्षणे दिसतात. पाच-सहा दिवसांनी रुग्ण बरा होतो. सुरुवातीला पुणे जिल्ह्यात आळंदी आणि खेड परिसरात रुग्ण आढळले होते. त्यानंतर संपूर्ण जिल्ह्यात प्रादुर्भाव वाढला.

घरोघरी जाऊन सर्वेक्षण करण्यास सुरुवात झाली. शासकीय रुग्णालयांमध्ये विशेष ओपीडी सुरू करण्यात आली. आरा साथीचा प्रादुर्भाव काहीसा कमी झाला असला, तरी नागरिकांनी काळजी घेणे आवश्यक आहे, अशी माहिती महापालिकेचे सहायक आरोग्य अधिकारी डॉ. सूर्यकांत देवकर यांनी दिली.

शाळांमध्ये काय चित्र?
शहरामध्ये आतापर्यंत 269 शाळांमध्ये डोळे तपासणी करण्यात आली आहे. यामध्ये 64 हजार 873 मुलांची तपासणी झाली आहे. यामध्ये 2067 विद्यार्थ्यांना डोळ्यांचा संसर्ग झाल्याचे निदर्शनास आले. शाळेत मुलांना डोळ्यांशी संबंधित कोणताही त्रास आढळून आल्यास ताबडतोब घरी पाठवावे, पालकांनी मुलांना डॉक्टरांच्या सल्लयाने औषधोपचार द्यावेत आणि पूर्ण बरे वाटेपर्यंत शाळेत पाठवू नये, असे आवाहन आरोग्य विभागाने केले आहे.

शहरातील आकडेवारी

दवाखान्यांमध्ये तपासण्यात आलेले
रुग्ण – 13,574
बरे झालेले रुग्ण – 10,946
रुग्णालयात
पाठवण्यात आलेले
रुग्ण – 12
अ‍ॅडमिट केलेले रुग्ण – 0

उपाययोजना काय?

शासकीय आणि खासगी शाळांमध्ये सर्वेक्षण
महापालिकेच्या सर्व दवाखान्यांमध्ये तपासणी आणि उपचार
खासगी रुग्णालयांना रुग्णांबाबत मार्गदर्शन सूचना
औषधांचा मुबलक साठा उपलब्ध

हेही वाचा :

Ethanol : कार्बन डायऑक्साईडपासून इथेनॉलनिर्मिती!

Chandrayan 3 : चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर आढळले गंधक

Back to top button