Ethanol : कार्बन डायऑक्साईडपासून इथेनॉलनिर्मिती! | पुढारी

Ethanol : कार्बन डायऑक्साईडपासून इथेनॉलनिर्मिती!

कोल्हापूर, राजेंद्र जोशी : Ethanol : जगभरातील प्रदूषणाला कारणीभूत ठरणारा कार्बन डायऑक्साईड पर्यावरणाला वरदान ठरू शकतो? सरधोपटपणे याचे उत्तर नाही असले, तरी या कार्बन डायऑक्साईडपासून इथेनॉल निर्मिती करण्याची किमया एका भारतीय कंपनीने साध्य केली आहे. कार्बन डायऑक्साईडपासून पर्यावरणपूरक इथेनॉल निर्मिती होऊ शकते आणि त्याचा उत्पादन खर्च प्रतिलिटर 35 रुपयांपर्यंत खाली आणता येणे शक्य आहे, असा दावा या कंपनीने केला आहे. त्याचे औद्योगिक स्वरूपामध्ये रूपांतर झाले, तर पर्यावरणाच्या क्षेत्रात एक मोठी किमया साध्य होऊ शकते. शिवाय, इंधन आणि इथेनॉलनिर्मिती उद्योगांना आपली कात टाकावी लागेल.

चेन्नईस्थित रामचरण कंपनीने पर्यावरणाच्या क्षेत्रामध्ये एक दमदार पाऊल टाकले आहे. या कंपनीने कार्बन डायऑक्साईडपासून इथेनॉल बनविण्याची आणि तेही इंधन गुणवत्तेचे इथेनॉल बनविण्याचे तंत्रज्ञान विकसित केले आहे. या पद्धतीने तयार केलेल्या इथेनॉलचा वापर पेट्रोलमध्ये मिश्रण करता येऊ शकतो, असा दावाही या कंपनीने केला आहे. Ethanol

रामचरण या कंपनीच्या प्रगतीचा हा विस्मयकारक आलेख बघून केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे चिरंजीव निखिल गडकरी यांच्या मानस अ‍ॅग्रो इंडस्ट्रीज अँड इन्फ्रास्ट्रक्चर या कंपनीने परस्पर सहयोगाचा करार केला आहे. मानस अ‍ॅग्रो ही कंपनी टाकाऊ पदार्थांपासून ऊर्जा निर्मितीच्या क्षेत्रामध्ये मोठे काम करते. रामचरण कंपनीने सध्या कार्बन डायऑक्साईडपासून इथेनॉल निर्मिती करणारा एक प्रकल्प नागपूर येथील मानसच्या साईटवर उभारला आहे. त्यांनी कार्बन डायऑक्साईडचे रूपांतर इथेनॉलमध्ये करण्याकरिता एक छोटा रिअ‍ॅक्टर बनविला असून त्याचे पेटंटही घेतले आहे.

यामधून कितीही मोठ्या प्रमाणात कार्बन डायऑक्साईडचे रूपांतर पेट्रोलमध्ये मिश्रित करण्याची गुणवत्ता असलेल्या इथेनॉलमध्ये करता येऊ शकते. या कंपनीने आता यापुढे एक पाऊल टाकत देशातील सार्वजनिक क्षेत्रातील कोळसा उद्योगाशी आपली बोलणी सुरू केली आहेत. याखेरीज ऊर्जा, पोलाद आणि सिमेंट उद्योगाबरोबरही त्यांची बोलणी सुरू असून संबंधित प्रकल्पातून उत्सर्जित होणार्‍या कार्बन डायऑक्साईडचे रुपांतर इथेनॉलमध्ये करण्यासाठी तंत्रज्ञान पुरविण्याची तयारीही दाखविली आहे.

Ethanol : उद्योगात नवी क्रांती

केंद्र सरकारने पेट्रोलमधील 20 टक्के इथेनॉल मिश्रणाच्या उद्दिष्टासाठी 2025 अखेरची मुदत निश्चित केली आहे. इथेनॉल उद्योगाला चालना देण्यासाठी केंद्राने मजबूत हमीभाव दिला आहे. यामुळे देशाची साखर कारखानदारी तरली आहे. आता रामचरणने विकसित केलेल्या इथेनॉलनिर्मितीसाठी कच्च्या मालाचे मूल्य शून्य टक्के असल्याने इथेनॉलनिर्मिती प्रतिलिटर 35 रुपयांपर्यंत खाली आणता येऊ शकते. इथेनॉल उद्योगात ही नवी क्रांती आहे. यामुळे इंधनावर खर्ची पडणार्‍या परकीय चलनासाठी दिलासा मिळू शकतो. बाजारात इंधनाचे भाव तुलनेने खाली आणण्यास वाव आहे. तथापि, स्वस्त दरात इथेनॉल उपलब्धतेचा एक नवा मार्ग द़ृष्टिपथात आल्यामुळे देशातील इथेनॉल उद्योग आणि साखर कारखानदारीला सतर्क व्हावे लागणार आहे.

हे ही वाचा :

Back to top button