अहमदनगर जिल्ह्यातील मुळा धरणावर दुष्काळाचे सावट! पावसाच्या हुलकावणीने शेतकरी चिंतातूर | पुढारी

अहमदनगर जिल्ह्यातील मुळा धरणावर दुष्काळाचे सावट! पावसाच्या हुलकावणीने शेतकरी चिंतातूर

राहुरी(अहमदनगर); पुढारी वृत्तसेवा : अ. नगर जिल्ह्यातील सर्वाधिक मोठे जलस्त्रोत असलेले मुळा धरण दुष्काळाच्या छायेत लोटल्याचे विदारक चित्र दिसत आहे. धरण पाणलोटासह लाभक्षेत्रात गेल्या महिनाभरापासून पावसाने हुलकावणी दिली आहे. आषाढ सरींनी चकवा दिल्यानंतर श्रावण सरीही न कोसळल्याने शेतकरी चिंतातूर झाला आहे. मुळा धरण पूर्ण क्षमतेने भरेल, अशी अपेक्षा सर्वांना लागली होती. मान्सून हंगामाच्या प्रारंभीच पावसाने हुलकावणी दिली. त्यानंतर जुलै महिन्यात काहीशा प्रमाणात पाणलोट क्षेत्रावर पावसाचा वर्षाव वाढल्याने धरणाकडे काही प्रमाणात पाण्याची आवक वाढली होती.

यामुळे धरणाच्या बॅक वाटरमध्ये 3 हजार ते 10 हजार क्यूसेक पाण्याची आवक होत असल्याने पाणी साठा आगेकूच करीत होता, परंतु जुलै समाप्तीलाच पावसाने थांबा घेतला. आषाढ सरींनी लाभक्षेत्रावर दडी मारल्याने ऐन पावसाळ्यात धरणाच्या कालव्यातून पाणी सोडण्याची मागणी झाली. ऑगस्ट महिन्यात 1 टिएमसी पाणी धरण साठ्यात जमा झाले नाही.

लाभक्षेत्रावर खरीप पिकांवर दुष्काळाची गडद छाया दाटली. मुळा धरण लाभक्षेत्र असलेल्या राहुरी तालुक्यामध्ये यंदा खरीप हंगामात सुमारे 35 हजार हेक्टर क्षेत्रावर पिके पावसाची चातकाप्रमाणे वाट पाहत आहेत. वर-वर हिरवाईने नटलेली पिके पावसाअभावी कोमेजल्याचे दुर्दैवी चित्र दिसत आहे. एकीकडे लाभक्षेत्रात पिकांवर आलेले संकट तर दुसरीकडे धरणाकडे पाणी आवकेने घेतलेला थांबा शेतकर्‍यांच्या खरीपासह आगामी रब्बी पिकांवरील संकटाची चाहूल दर्शवित आहे.

श्रावण प्रारंभ होऊनही सरी कोसळत नसल्याने पाट पाण्याच्या नियोजनावर भिस्त अवलंबून आहे. मुळा धरण साठा 20 हजार दलघफूच्या समीप घुटमळत आहे. धरण पूर्ण क्षमतेने भरण्यास अद्यापी 6 हजार दलघफू पाणी साठ्याची नितांत गरज आहे. धरणाच्या पाणलोट क्षेत्रावरील डोंगरमाथ्यातून होणारा पाझर तर नाममात्र कोसळणार्‍या रिमझिम सरींमुळे अत्यल्प प्रमाणात पाण्याची आवक धरणाकडे होत आहे. गेल्या 10 दिवसांपासून धरणाकडे 1 हजार क्यूसेक ते 2 हजार क्यूसेक या प्रमाणेच नवी पाण्याची आवक झाली.

जिल्ह्यात सर्वाधिक मोठे जलस्त्रोत असल्याने दक्षिणेचा बहुतेक भाग मुळा धरणाच्या पाण्यावर अवलंबून आहे. त्यामुळे मुळा धरण पूर्ण क्षमतेने भरले तरचं दक्षिण जिल्ह्याची तहाण भागणार आहे. सुमारे 90 हजार हेक्टर क्षेत्र हे धरणाच्या डाव्या व उजव्या कालव्यावर आधारित आहे. तालुक्यात खरीप पेरणी झालेल्या सुमारे 35 हजार हेक्टर क्षेत्रावर बाजरी, मका, तूर, मुग, भुईमूग, सोयाबीन, कापूस क्षेत्र संकटात आहे. यंदा खरीपामध्ये ऊस क्षेत्र कमालीचे घटले आहे. राहुरीतील ऊसावर अवलंबून असलेल्या डझणभर कारखान्यांना या संकटाचा सामना करावा लागेल.

समन्यायी पाणी वाटपाची पुन्हा टांगती तलवार..!

मराठवाडा हद्दीतील तहाण भागत नसल्यास जिल्ह्यातील मुळा व भंडारदरा धरणातून समन्यायी पाणी वाटपाच्या कायद्याद्वारे पाणी सोडण्याची प्रक्रिया अनेकदा राबविली. पाच वर्षांपासून समन्यायीची टांगती तलवार अतिवृष्टीच्या तडाख्याने शमली, परंतु यंदा राज्यभरात पावसाने हुलकावणी दिल्याने समन्यायीची टांगती तलवार पुन्हा कोसळल्यास नगर जिल्ह्यावर पाण्याचे मोठे संकट कोसळण्याची शक्यता जाणकार वर्तवित आहेत.

मुळा धरणाचा पाणीसाठा 20 हजाराच्या पुढे सरकेना

महिन्यापासून धरण साठ्यामध्ये अपेक्षित वाढ झालेली नाही. सद्यस्थितीला धरण साठा 20 हजार 972 दलघफू इतका आहे. मुळा धरणाकडे सायंकाळी केवळ 2,441 क्यूसेक इतकी आवक होत होती.

हेही वाचा

मराठवाड्याची शान पश्मी कारवान, देश-विदेशातून श्वानाला मागणी

‘त्यांचे’ पाय शहामृगासारखे!

अहमदनगर : सराफा दुकानात चोरी करणारा ताब्यात

Back to top button