बारामती कचरा डेपोस भीषण आग ; ८० लाखांच्या नुकसानीचा प्राथमिक अंदाज | पुढारी

बारामती कचरा डेपोस भीषण आग ; ८० लाखांच्या नुकसानीचा प्राथमिक अंदाज

बारामती : पुढारी वृत्तसेवा : येथील नगरपालिकेच्या कचरा डेपोस गुरुवारी (दि. २४) पहाटे दोनच्या सुमारास भीषण आग लागली. या आगीमध्ये कचऱ्याचे वर्गीकरण करणारी विविध प्रकारची यंत्रणा तसेच कचरा जळून खाक झाला आहे. या आगीमुळे जवळपास ८० लाख रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. ही आग नेमकी कशामुळे लागली याच्या कारणांचा शोध नगरपालिकेचे मुख्याधिकारी महेश रोकडे घेत आहेत. पहाटे दोनच्या सुमारास कचरा डेपोला आग लागल्याची माहिती समजल्यानंतर नगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांनी कचरा डेपो कडे धाव घेतली.

बारामती नगर परिषदेसह एमआयडीसी, छत्रपती सहकारी साखर कारखाना, माळेगाव सहकारी साखर कारखाना आदींच्या अग्निशामक दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या व त्यांनी आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला. ही आग अतिशय भीषण होती. या आगीमध्ये बारामती नगरपालिका तसेच लुको कंपनीची कचरा वर्गीकरण करणारी जवळपास सात ते आठ यंत्रे जळून भस्मसात झाली आहेत. याशिवाय वर्गीकरण केलेला जवळपास ९०० टन गठ्ठे बांधून ठेवलेला कचरा देखील जळून खाक झाल्यामुळे जवळपास ४० लाख रुपयांचे कचऱ्याचे तर यंत्रणेचे जवळपास २५ ते ३० लाख रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.

या ठिकाणी दोन वॉचमन सातत्याने कार्यरत असतात तसेच नगरपालिकेने सीसीटीव्ही यंत्रणादेखील बसविलेली आहे, मात्र ही आग नेमकी कशामुळे लागली हे अद्याप समजू शकलेले नसल्याची माहिती मुख्याधिकारी महेश रोकडे यांनी दिली. दरम्यान रात्री बाराच्या सुमारास बारामती नगर परिषदेमध्ये शहरात आग लागली असल्याचा एक दूरध्वनी आलेला होता. त्यानंतर नगरपालिकेने अग्निशामन यंत्रणेला सतर्क केले होते. मात्र त्यावेळेस शहरात कोठेही आगीची घटना घडलेली नव्हती, अशी ही माहिती आता पुढे येत आहे.

ही आग काही समाजकंटकांनी जाणीवपूर्वक लावली असल्याचा दाट संशय नगरपालिकेच्या सूत्रांनी व्यक्त केला आहे. कचरा डेपोमध्ये आग लागण्यासारखी कोणतीही परिस्थिती नसताना अचानक एवढ्या मोठ्या प्रमाणात लागली ही बाब संशयास्पद असल्याचे मुख्याधिकारी रोकडे यांनी सांगितले. याचा सखोल तपास केला जाईल असेही ते म्हणाले.

 

हेही वाचा :

मित्रानीच केला गेम ! भिशीच्या वादातून गोळ्या घालून खून; गाडीतच केला गोळीबार

धुळे : अल्पवयीन बालिकेवर अत्याचार करणाऱ्यास जन्मठेप

Back to top button