पिंपरी(पुणे); पुढारी वृत्तसेवा : भिशीच्या पैशाच्या वादातून कारमधून प्रवास करीत असलेल्या दोघांनी एका मित्राचा गोळ्या घालून खून केला. ही घटना बुधवारी (दि. 23) भरदिवसा दुपारी साडेचारच्या सुमारास पिंपळे निलख येथील रक्षक चौकात घडली. सागर सर्जेराव शिंदे (रा. मधुबन सोसायटी, जुनी सांगवी), असे मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मयत सागर शिंदे आणि संशयित आरोपी मित्र आहेत. दरम्यान, बुधवारी दुपारी एकाच कारमधून तिघेजण सांगवी येथील रक्षक चौकातून जात होते.
त्या वेळी गाडीतच भिशीच्या पैशांच्या कारणावरून त्यांच्यात वाद झाला. या वादातून चिडलेल्या आरोपींनी पिस्तुलातून सागर यांच्यावर गोळ्या झाडल्या. छातीत गोळी लागल्याने सागर याचा जागीच मृत्यू झाला. रक्षक येथील भारत इलेक्ट्रिक कंपनीसमोर हा संपूर्ण प्रकार घडला. या घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलिसांसह गुन्हे शाखेचे पोलिस घटनास्थळी दाखल झाले. भरदिवसा झालेल्या या घटनेमुळे शहरात एकच खळबळ उडाली.
खून केल्यानंतर आरोपी गाडीतून खाली उतरले. त्यांनी चौकात चालत जाऊन एका दुचाकीस्वाराला अडवले. त्याची दुचाकी घेऊन आरोपींनी पळ काढला.
मयत सागर याच्यावर सन 2013 मध्ये चतुःश्रृंगी पोलिस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल आहे. याच वादातून हा प्रकार घडला असल्याचे बोलले जात आहे.
घटनेनंतर गुन्हे शाखेची पथके घटनास्थळी दाखल झाली. अवघ्या काही तासांच्या आत गुन्हे शाखेने दोन संशयितांच्या मुसक्या आवळल्या. गुंडाविरोधी आणि दरोडाविरोधी पथकाने ही कामगिरी केली.
पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या एका आरोपीने भिशीच्या पैशाच्या वादातून खून केल्याची कबुली दिली. मात्र, पोलिसांना या प्रकरणात वेगळाच संशय आहे. त्यानुसार, सर्व शक्यता गृहीत धरून रात्री उशिरापर्यंत चाचपणी सुरू होती. तपासाअंती या प्रकणात वेगळीच माहिती समोर येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
हेही वाचा