स्वतंत्र बेरियाट्रिक विभाग सुरू करणारे ससून राज्यातील पहिले वैद्यकीय महाविद्यालय | पुढारी

स्वतंत्र बेरियाट्रिक विभाग सुरू करणारे ससून राज्यातील पहिले वैद्यकीय महाविद्यालय

पुणे; पुढारी वृत्तसेवा : ससून सर्वोपचार रुग्णालयात गेल्या सहा महिन्यांत 15 बेरियाट्रिक शस्त्रक्रिया पार पडल्या. आता रुग्णालयात यासाठी स्वतंत्र वॉर्डही सुरू करण्यात आला आहे. स्वतंत्र बेरियाट्रिक विभाग सुरू करणारे ससून हे राज्यातील पहिले शासकीय वैद्यकीय महाविद्यालय ठरले आहे. या शस्त्रक्रिया पूर्णपणे मोफत केल्या जात आहेत. वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते ससून रुग्णालयामध्ये बॅरियाट्रिक सर्जरी (लठ्ठपणावरील शस्त्रक्रिया) वॉर्डचे उद्घाटन करण्यात आले. विभागामध्ये 100 ते 160 किलो वजनाच्या रुग्णांची यशस्वी शस्त्रक्रिया होऊन त्यांना सर्व औषधोपचारही मोफत मिळत असल्याबद्दल मुश्रीफ यांनी समाधान व्यक्त केले.

विभागामध्ये 10 खाटांची व्यवस्था करण्यात आली आहे. नवीन 11 मजली इमारतीच्या चौथ्या मजल्यावर विभाग सुरू करण्यात आला आहे. रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. संजीव ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली शस्त्रक्रिया विभाग सुरू करण्यात आला आहे. राज्य शासनाने 4 मार्च 2013 पासून राज्यामध्ये लठ्ठपणा जनजागृती व उपचार अभियानाची सुरुवात केली आहे. या अभियानांतर्गत लठ्ठपणावरील उपचार म्हणून या वॉर्डची सुरुवात करण्यात आली आहे. तरी महाराष्ट्रातील जनतेने या सुविधेचा लाभ घ्यावा, असे आवाहन डॉ. ठाकूर यांनी केले आहे. ससून हॉस्पिटलमध्ये लठ्ठपणावरील सर्जरी पूर्णपणे मोफत आणि दुर्बिणीद्वारे केली जाते. त्यासाठी कोणत्याही प्रकारचे शुल्क आकारले जात नाही, तरी समाजातील रुग्णांनी याचा पूरेपूर फायदा घ्यावा. – डॉ. संजीव ठाकूर, अधिष्ठाता, ससून सर्वोपचार रुग्णालय

हेही वाचा

सहकारी दूध संघांना सरकारच्या पाठबळाची गरज

दाभोळकर, पानसरे, गौरी लंकेश,कलबुर्गी हत्येत समान धागा आहे का?

सायबर चोरटा पोलिसावर भारी! पोलिसालाच 32 लाखांचा गंडा

Back to top button