

पुणे; पुढारी वृत्तसेवा : राज्य सरकारने गायीच्या दूध खरेदी दरात प्रतिलिटरला 2 रुपयांनी वाढ करून दर 34 रुपये केला आहे. सहकारी दूध संघांना शासनाच्या निर्णयाची अंमलबजावणी करावी लागत असल्याने त्यांना आर्थिक तोट्याला सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे एकतर सरकारने दुधाला दोन रुपयांचे अर्थसाहाय्य करून सहकारी दूध संघ आणि दूध उद्योगास पाठबळ देण्याची मागणी होत आहे.
याबाबत पुणे जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ तथा कात्रज डेअरीचे अध्यक्ष भगवान पासलकर म्हणाले, संघाकडे सध्या 1 लाख 75 हजार लिटर इतके दूध संकलन होत आहे. त्यापैकी सुमारे एक लाख लिटर दूध पाऊच पॅकिंगमधील विक्री होत असून, 15 हजार लिटर दूध महानंद व मदर डेअरीस पाठविण्यात येते. शिल्लक 55 ते 60 हजार लिटर दूध खासगी मोठ्या डेअर्यांना ठोकमध्ये सुट्या स्वरूपात विक्री करावे लागते. त्यासाठी पोहोच दूध देण्यास अतिरिक्त 3 रुपये खर्च येत असल्याने संघास आर्थिक नुकसान होत आहे. त्यामुळे शासनाने गाय दूध खरेदीवर प्रतिलिटरला 2 रुपयांचे अर्थसाहाय्य द्यावे अन्यथा संघाला 34 रुपये दूध दर देणे परवडणार
नसल्याचे पत्र दुग्ध व्यवसाय विकास आयुक्तांना दिले आहे.
राज्य दूध उत्पादक प्रक्रिया व व्यावसायिक कल्याणकारी संघाचे मानद सचिव आणि ऊर्जा दुधाचे चेअरमन प्रकाश कुतवळ म्हणाले, मागणी आणि पुरवठ्यानुसार दुधाचे खरेदी दर ठरतात. दूध पावडर व बटरला मागणी वाढल्याने गायीच्या दुधाचा खरेदी दर लिटरला 38 रुपये झाला होता. मागणी कमी झाल्यानुसार हे दर कमी झाले. म्हणून दूध उद्योगावर होणारी टीका चुकीची आहे. गुजरातमधील अमूल, कर्नाटकातील नंदिनी दुधाला अनुदान देण्यासाठी तेथील राज्य सरकारे अर्थसाहाय्य करीत असून, महाराष्ट्र सरकारनेही हस्तक्षेप करीत आर्थिक मदत करण्याची सध्या गरज निर्माण झाली आहे.
जागतिक बाजारात दूध पावडरचे प्रतिकिलोचे दर 210 रुपयांवरून कमी होत 180 ते 190 रुपये झाले आहेत. तर भारतात पावडरचे दर 240 ते 250 रुपयांवर स्थिर आहेत. मात्र, तयार केलेली पावडर ही 38 रुपये दराने दूध खरेदी करून केलेली असून, मागणी नसल्याने साठे विक्रीविना पडून आहेत. जागतिक बाजारातील दूध पावडरच्या दरात झालेली घसरण आणि दूध खरेदी आणि विक्रीचा ताळमेळ बसत नसल्याने सध्या दुग्ध उद्योगात चिंता व्यक्त होत असल्याची माहितीही कुतवळ यांनी दिली.
हेही वाचा