सायबर चोरटा पोलिसावर भारी! पोलिसालाच 32 लाखांचा गंडा | पुढारी

सायबर चोरटा पोलिसावर भारी! पोलिसालाच 32 लाखांचा गंडा

पुणे; पुढारी वृत्तसेवा : क्रिप्टोतील गुंतवणुकीवर ट्रेडिंगच्या बहाण्याने जादा नफा मिळवून देण्याचे आमिष दाखवत सायबर चोरट्यांनी एका पोलिस कर्मचार्‍यालाच 32 लाख 22 हजार 766 रुपयांचा आर्थिक गंडा घातल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी, धायरी येथे राहणार्‍या 32 वर्षीय पोलिसाने शिवाजीनगर येथील सायबर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार सायबर चोरट्यांच्या विरुद्ध माहिती तंत्रज्ञान कायद्यानुसार फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ही घटना 25 मे 2023 पासून गुन्हा दाखल होईपर्यंतच्या कालावधीत ऑनलाईन माध्यमातून घडली आहे. फिर्यादी हे शहर पोलिस दलात कार्यरत पोलिस कर्मचारी आहेत. त्यांना सायबर चोरट्यांनी वेबसाईट व व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपच्या माध्यमातून जाळ्यात खेचले. एटीएम-ओए.सीसी नावाच्या वेबसाईटवर ट्रेडिंगचे खाते उघडण्यास भाग पाडले.

पुढे या वेबसाईटच्या माध्यमातून ट्रेडिंग केल्यास भरघोस नफा मिळेल, असे प्रलोभन दाखविले. फिर्यादीने पत्नीचे दागिने गहाण ठेवून इतरांकडून कर्ज घेऊन क्रिप्टोमध्ये पैसे गुंतविले. त्यातील काही रक्कम सुरुवातीला नफा म्हणून सायबर चोरट्यांनी परत केली. मात्र, त्यानंतर त्यांना राहिलेली रक्कम परत न करता त्यांची 32 लाख 22 हजार रुपयांची फसवणूक करण्यात आल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. तपास वरिष्ठ पोलिस निरीक्षक मीनल सुपे पाटील करीत आहेत.

हेही वाचा

पुणे : कर्जाच्या बहाण्याने घातला साडेआठ लाखांना गंडा

लालपरीचं चांगभलं ! पुणे विभागाच्या उत्पन्नात चौपट वाढ, तर प्रवासी पाचपट वाढले

अभिनेत्री सई लोकूर बेळगावात करणार पहिल्या बाळाचं स्वागत

Back to top button