शिरूरच्या पूर्व भागातील घोड नदी कोरडीठाक | पुढारी

शिरूरच्या पूर्व भागातील घोड नदी कोरडीठाक

मांडवगण फराटा(पुणे); पुढारी वृत्तसेवा : जिल्ह्यात गेल्या काही दिवसांत अनेक ठिकाणी मुसळधार पावसामुळे नद्यांना पूर आले. परंतु शिरूरच्या पूर्व भागातील शेतकर्‍यांसाठी वरदान असलेले घोड नदीचे पात्र मात्र कोरडेठणठणीत पडले आहे. इतर नद्या दुथडी भरून वाहत असताना घोड नदी मात्र अजूनही तहानलेलीच असल्याचे चित्र दिसून येत आहे. घोड नदीवरील चिंचणी (ता. शिरूर) येथील धरणात अद्याप पुरेसा पाणीसाठा झालेला नाही. त्यामुळे नदीपात्र व धरणाच्या डाव्या-उजव्या कालव्यात पाणी सोडण्यात आलेले नाही.

परिणामी, शिरूर व श्रीगोंदा तालुक्यांतील या नदी व कालव्यातील पाण्यावर अवलंबून असलेले हजारो हेक्टर क्षेत्र पावसाची वाट बघत आहे. चिंचणी धरणाच्या खालील भागातील निर्वी, शिरसगाव काटा, पिंपळसुटी, मांडवगण फराटा, वडगाव रासाई, कुरुळी, कोळगाव डोळस, इनामगाव, तांदळी या गावांतील पिके पाण्याअभावी जळून जाण्याच्या मार्गावर आहेत. या परिसरात अजूनही मोठा पाऊस पडलेला नाही. त्यामुळे कुठेही पाणीपातळी वाढलेली नाही. त्यामुळे शेतकर्‍यांना धरण भरण्याची प्रतीक्षा आहे. पिण्यासाठी तरी नदीपात्रात पाणी सोडावे, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.

ग्रामस्थांचा पाण्यासाठी टाहो

शिरसगाव काटा गावाला चासकमान कालवा असून, शेवटच्या टोकावर गाव असल्याने यावरच शेती अवलंबून आहे. या कालव्यास पाणी सोडल्यास निर्वी, कोळगाव डोळस, शिरसगाव काटा या गावांना फायदा होऊ शकतो. दुसरीकडे घोड नदीतून कालव्याला पाणी सोडल्यास इनामगाव, शिरसगाव, पिंपळसुटी, तांदळी या गावांना फायदा होतो. या गावांना सध्या पाणीटंचाई जाणवत असून, शिरसगाव काटा ग्रामस्थांनी पाण्यासाठी टाहो फोडला आहे.

शिरूरच्या पूर्व भागातील शेती ही पूर्णपणे घोड नदीच्या पाण्यावर अवलंबून आहे. जुलै महिना संपला तरीही या भागांमध्ये अद्यापि जोरदार पाऊस पडला नाही, त्यामुळे शेती कोरडीच आहे. पिके धोक्यात आली असून, शेतकर्‍यांनी बँकांचे कर्ज कसे फेडायचे हा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. गावांना लवकरच टँकर सुरू करावे लागतील अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे घोड धरणात पाणी सोडण्याची मागणी ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आली आहे.

नरेंद्र माने,
संचालक, घोडगंगा साखर कारखाना

चिंचणी धरणाच्या वरील भागात सहा धरणे असून, या धरणांमध्ये सध्या 62 टक्के पाणीसाठा आहे. त्यामुूळे वरील धरणातील पाणी चिंचणी धरणामध्ये सोडावे जेणेकरून शेतकर्‍यांना चिंचणी धरणातून हे पाणी घोड नदीपात्रामध्ये सोडण्यासाठी मदत होईल. तसेच भीमा-घोड नदीचा नदीजोड प्रकल्प होणे काळाची गरज आहे.

श्रीनिवास घाडगे, संचालक,
श्रीगोंदा सहकारी साखर कारखाना

चिंचणी धरणातील पाण्यावर शेती अवलंबून असून, पिके जळून गेली आहेत. पिण्याच्या पाण्यासाठी आता वणवण भटकण्याची वेळ आली आहे. चिंचणी धरणातील पाण्यावर एमआयडीसी अवलंबून आहे. वरील धरणामध्ये बर्‍यापैकी पाणीसाठा असून, तो त्वरित चिंचणी धरणामध्ये सोडावा. जेणेकरून नंतर ते पाणी घोड नदीला सोडण्यासाठी मदत होईल.

सुभाष कळसकर, माजी उपाध्यक्ष,
घोडगंगा साखर कारखाना

हेही वाचा

रावणगाव : जलजीवन योजनेच्या चारीतच गटार योजना

पारगाव : पिके वाचविण्यासाठी शेतकर्‍यांची धडपड

पुणे : वैद्यकीय अधिकार्‍यांच्या कामाचे ट्रॅकिंग

Back to top button