रावणगाव : जलजीवन योजनेच्या चारीतच गटार योजना | पुढारी

रावणगाव : जलजीवन योजनेच्या चारीतच गटार योजना

रावणगाव(पुणे); पुढारी वृत्तसेवा : स्वामी चिंचोली (ता. दौंड) येथे जलजीवन मिशन योजनेंतर्गत जलवाहिनीचे काम सुरू आहे. स्वच्छ पाणीपुरवठा ग्रामस्थांना करणे गरजेचे असताना संबंधित ठेकेदाराकडून हलगर्जीपणे काम केले जात आहे. वॉर्ड क्र. तीन येथे दलित वस्ती सुधारणा योजनेंतर्गत गटार योजनेसाठी 10 लाख रुपये निधी मंजूर झाला असून, गटार योजना व जलजीवन मिशन योजनेचे काम एकाच चारीतून चालले असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.

जलजीवन मिशनच्या चारीतून सांडपाण्याच्या गटार योजनेचे काम होत असल्याने भविष्यात ही जलवाहिनी खराब झली, तर यामध्ये सांडपाण्याचा निचरा होणार आणि तेच पाणी गावकर्‍यांना पिण्यासाठी मिळणार हे नक्की. त्यामुळे त्यांच्या आरोग्यास धोका निर्माण होऊ शकतो. या जलजीवन व गटार योजनेच्या दोन्ही ठेकेदारांचा ठरवून हा भोंगळ कारभार चाललेला दिसून येत आहे.

गावातील काही भागात ही जलवाहिनी टाकून झाली असून, काही ठिकाणी तर ती पूर्ण बुजवली आहे. ग्रामस्थांना नळजोड देणार कसे आता हा प्रश्न आहे. मात्र, काही ठिकाणी ही जलवाहिनी तशीच उघडी आहे. घरांजवळ ही लाइन उघडी असल्याने लहान मुले, मोटारसायकल यांचे छोटे-मोठे अपघात घडू शकतात. जलवाहिनीसाठी खोदकामही कमी-जास्त प्रमाणात केले आहे. एकंदरीतच हे सर्व काम मनमानीपणे सुरू असल्याचे दिसत आहे. संबंधित ठेकेदाराने गटार योजना दुसर्‍या चारीतून करण्याची मागणी ग्रामस्थ करीत आहेत.

हेही वाचा

पुणे : वर्क फ्रॉम होमच्या बहाण्याने साडेसोळा लाखांचा गंडा

पारगाव : पिके वाचविण्यासाठी शेतकर्‍यांची धडपड

कोल्हापूर : मुलींना दारू पाजून लैंगिक अत्याचार खटल्यात 2 नराधमांना कारावास

Back to top button