Rahul Gandhi : अविश्‍वास प्रस्‍तावावरील राहुल गांधींच्‍या भाषणातील ठळक ५ मुद्दे  | पुढारी

Rahul Gandhi : अविश्‍वास प्रस्‍तावावरील राहुल गांधींच्‍या भाषणातील ठळक ५ मुद्दे 

पुढारी ऑनलाईन डेस्क : लोकसभेत अविश्वास प्रस्तावावर सुरू असलेल्या चर्चेदरम्यान आज (दि.९) काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी केंद्रातील भाजप सरकारवर हल्लाबाेल केला.  मणिपूरमध्ये सुरू असलेल्या हिंसाचार ते देशातील शेतकऱ्यांचे प्रश्नांबाबत ते बाेलले. जाणून घेवूया त्‍यांच्‍या  भाषणातील पाच ठळक मुद्दे . (Rahul Gandhi)

माझा प्रवास अजून संपलेला नाही

राहुल गांधी म्हणाले की,  “१३० दिवस मी भारताच्या एका कोपऱ्यातून दुसऱ्या कोपऱ्यात गेलो. मी एकटा नव्हतो. खूप लोक माझ्यासोबत होते. मी समुद्र किनाऱ्यापासून ते काश्मीरच्या बर्फाळ पहाडापर्यंत चालत गेलो. हा प्रवास अजून संपलेला नाही. हा प्रवास असाच सुरु राहील. मी लडाखलाही नक्की जाणार आहे. प्रवासादरम्यान मला अनेकांनी विचारले की, “राहुल, तू का चालत आहेस? कन्याकुमारी पासून काश्मीरपर्यंत का जात आहात? सुरुवातीला माझ्या तोंडून उत्तर यायचे नाही. कदाचित मलाही कळले नसेल की मी ही यात्रा का सुरू केली? जेव्हा मी कन्याकुमारीपासून सुरुवात केली तेव्हा मला वाटले की मला भारत समजून घ्यायचा आहे, काही दिवसातच मला समजू लागले. की मला काय आवडते. मी मोदीजींच्या तुरुंगात कशासाठी जायला तयार आहे, मी १० वर्षे रोज शिव्या खाल्ल्या. या गोष्टी मला समजुन घ्यायच्या आहेत. नेमके हे काय आहे समजून घ्यायचे होते.”

‘माझा अहंकार गेला’

अनेक वर्षांपासून मी रोज आठ ते दहा किलोमीटर धावताे आहे. सुरुवातीला मी विचार केला की मी, 10 किमी धावू शकतो तेव्हा २५ किमी चालू शकतो. … तेव्हा माझ्या मनात अहंकार निर्माण झाला; पण भारत अहंकार पूर्णपणे नष्ट करतो. एका सेकंदात हटवतो. यात्रेदरम्यान दोन-तीन दिवसांत माझे गुडघे दुखू लागले. गुडघ्‍याला झालेली जुनी जखम होती. दररोज, प्रत्येक पाऊलाला दुखत होते. पहिल्या दोन-तीन दिवसात जो अहंकार होता तो आता मुंगी एवढा झाला. संपूर्ण अहंकार नाहीसा झाला. रोज भीतीने चालायचो की उद्या चालता येईल का? ही माझ्या मनात वेदना होती. मला ते सहन होत नव्हते; पण यात्रेवेळी एक आठ वर्षाची लहान मुलीने मला एक पत्र दिले. आठ वर्षांच्‍या मुलीने लिहलं हाेतं की, “राहुल मी तुझ्यासोबत चालते आहे, काळजी करू नकोस.” त्या मुलीने मला बळ दिले, लाखो लोकांनी मला बळ दिले. एखादा शेतकरी यायचा, मी त्याला माझा मुद्दा सांगायचो, तू हे कर, तू ते कर. हजारो लोक आले, मग मी बोलू शकलो नाही. मनातली बोलायची इच्छा थांबली. शांतता होती. तो जमावाचा आवाज होता. भारत-जोडो, भारत-जोडो. जो माझ्याशी बोलत राहिला, त्यांचा आवाजात ऐकत राहिलो.

शेतकरी म्हणाला- उद्योगपतींनी माझ्या विम्याचे पैसे हिसकावले

यावेळी राहुल गांधी म्‍हणाले की,  दररोज सकाळी ६ ते रात्री ७-८ पर्यंत गरीब, शेतकरी, मजूर, व्यापारी यांचे आवाज ऐकू येत होते. मी ऐकत राहिलो. एक शेतकरी माझ्याकडे आला आणि त्या शेतकऱ्याने हातात कापूस धरला होता. तो मला म्हणाला की राहुलजी, हे माझ्या शेतात उरले आहे, बाकी काही उरले नाही. मी त्याला विचारले विम्याचे पैसे मिळाले का? शेतकऱ्याने माझा हात धरला आणि मला पैसे मिळाले नसल्याचे सांगितले. भारतातील बड्या उद्योगपतींनी ते माझ्याकडून हिसकावून घेतले; पण यावेळी एक गोष्ट जाणवली. त्याच्या मनातील वेदना माझ्या मनाला भिडल्या. मला फक्त त्या व्यक्तीचा आवाज ऐकू येत होता, गर्दीचा नाही. त्याची वेदना, त्याची दुखापत, त्याचे दु:ख, माझे दु:ख झाले.

‘मी मणिपूरला गेलो, आजपर्यंत पंतप्रधानांनी भेट दिली नाही’

” काही दिवसांपूर्वीच मी मणिपूरला गेलो होतो. आमचे पंतप्रधान आजपर्यंत तेथे गेलेलेनाहीत. कारण त्यांच्यासाठी मणिपूर हिंदुस्थान नाही. मी मणिपूर हा शब्द वापरला, पण आजचे वास्तव हे आहे की मणिपूर टिकले नाही. तुम्ही मणिपूरचे दोन तुकडे केलेत, तोडले. मी मणिपूरमधील मदत छावण्यांमध्ये गेलो. तिथल्या महिलांशी बोललो, मुलांशी बोललो, जे पंतप्रधानांनी आजपर्यंत केलेले नाही.

मणिपूरमध्ये भारताची हत्या केली

राहुल यांनी सरकारवर निशाणा साधताना म्हणाले की,”एका महिलेला विचारले की, तुम्हाला काय झाले आहे? ती म्हणाली की, मला एक लहान मुलगा होता, एकच मुलगा होता, त्याला माझ्या डोळ्यांसमोर गोळ्या घातल्या गेल्या. तुम्ही तुमच्या मुलांचा विचार करा. मी रात्रभर त्याच्या मृतदेहासोबत पडून राहिले. मी घाबरले, मी घर सोडले.”   मी विचारले की तिने काहीतरी आणले असेल का? तिने सांगितले की फक्त माझे कपडे माझ्यासोबत आहेत; मग ती आपल्या मुलाचा फोटो काढते आणि म्हणते की, आता माझ्याकडे हेच आहे. दुस-या शिबिरातल्या आणखी एका महिलेने तुझे काय होणार असे विचारले. मी प्रश्न विचारताच ती थरथरू लागली, मनातले दृश्य आठवले आणि बेशुद्ध झाली. त्यांनी मणिपूरमध्ये भारताची हत्या केली आहे, त्यांच्या राजकारणाने मणिपूरला मारले नाही, मणिपूरमध्ये भारताचा घात केला आहे. मणिपूरमध्ये भारताची हत्या झाली आहे, असा आरोपही त्यांनी केला.

हेही वाचा 

Back to top button