Chandrapur bribe case : ११ हजारांची लाच घेताना तलाठी, मंडळ अधिकाऱ्याला अटक | पुढारी

Chandrapur bribe case : ११ हजारांची लाच घेताना तलाठी, मंडळ अधिकाऱ्याला अटक

चंद्रपूर, पुढारी वृत्तसेवा: शेत जमिनीवरील नाव कमी करण्यासाठी एका शेतकऱ्याकडून 11 हजाराची लाच घेताना तलाठी व मंडळ अधिकाऱ्याला  रंगेहात पकडण्यात आहे. म्हसली साझा क्रमांक 29 चे तलाठी राजू विठ्ठल रग्गड व मंडळ अधिकारी सुनील महादेव चौधरी असे आरोपींची नावे आहेत. ही कारवाई चंद्रपूर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने मंगळवारी केली. यामुळे महसूल खात्यात खळबळ उडाली आहे. (Chandrapur bribe case)

याबाबत अधिक माहिती अशी की, फिर्यादी जिल्हा परिषदेमधून सेवानिवृत्त झाले आहेत. ते सध्या गडचिरोली जिल्ह्यात कुटुंबासहित वास्तव्यास आहेत. फिर्यादी तक्रारदार व त्यांच्या भावाच्या नावाने चंद्रपूर जिल्ह्यातील चिमूर तालुक्यात अडेगाव देशमुख येथे गट क्रमांक 243 मधील 2.84 हे.आर. चौ.मी शेतजमीन आहे. त्या शेतजमिनीवर फिर्यादी यांच्या आत्याचे नाव आहे. आत्याने स्वतः विनामोबदला हक्कसोड पत्र तयार करून दुय्यम निबंधक श्रेणी 1  कार्यालयात नोंदणी केली होती. (Chandrapur bribe case)

त्या शेत जमिनीवर फिर्यादी व त्याच्या भावाचे नाव जशेच्या तसे ठेवून व आत्याचे नाव वगळायचे होते. या करीता तलाठी राजू रग्गड यांनी फिर्यादी यांना 15 हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली होती. तडजोड अंती 11 हजार रुपये लाच देण्याचे ठरले होते.फेरफारच्या क्षुल्लक कामाकरिता 15 हजार रुपये लाच देण्याची फिर्यादी यांची इच्छा नसल्याने त्यांनी या प्रकरणाबाबत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल केली होती.

सदर तक्रारीची पडताळणी केल्यानंतर काल मंगळवारी लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचला  होता. कालच सायंकाळी तडजोडीअंती तलाठी राजू रग्गड यांनी 11 हजार रुपये स्वीकारण्याची तयारी दर्शविली होती.  तलाठी कार्यालय चिमूर येथील टीचर कॉलनीतील कार्यालयात आरोपी राजू रग्गड यांना 11 हजार रुपयांची लाच स्वीकारताना लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात अटक केली.

ही कारवाई पोलीस अधीक्षक राहुल माकनिकर, अप्पर पोलीस अधीक्षक संजय पुरंदरे, उपपोलीस अधीक्षक मंजुषा भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक प्रशांत पाटील, पोलीस कर्मचारी संदेश वाघमारे, रोशन चांदेकर, वैभव गाडगे, अमोल सीडाम यांच्या पथकाने केली.

हेही वाचा 

चंद्रपूर : अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या नराधमांना अटक

चंद्रपूर: विजेच्या धक्क्याने ग्रामपंचायत सदस्याचा मृत्यू; एक गंभीर 

 

Back to top button