डॉ. नरेंद्र दाभोलकर खून खटला निर्धार सभेत तपास यंत्रणेचा निषेध | पुढारी

डॉ. नरेंद्र दाभोलकर खून खटला निर्धार सभेत तपास यंत्रणेचा निषेध

जळगाव : शहीद डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या खुनाच्या खटल्याच्या निकालासंदर्भाच्या पार्श्वभूमीवर महात्मा गांधी सार्वजनिक वाचनालयाच्या सहकार्याने व महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या जळगाव शहर शाखेच्या वतीने तसेच समविचारी संस्था संघटनेच्या सहभागाने १७ मे रोजी संध्याकाळी निर्धार सभा घेण्यात आली. सभेत, निकालाबाबत असमाधान व्यक्त करत, आलेल्या निकालाचे विश्लेषण मान्यवरांनी केले. तसेच यापुढेही हिंसा मुक्त समाज निर्मितीसाठी सातत्याने प्रयत्न करण्याचा निर्धार करण्यात आला.

कार्यक्रमात अध्यक्षस्थानी माजी उप प्राचार्य नंदकुमार भारंबे होते. प्रमुख मार्गदर्शक म्हणून सत्यशोधक समाजाचे अध्यक्ष डॉ. मिलिंद बागुल आणि महाराष्ट्र अंनिसचे राज्य पदाधिकारी प्रा. डी. एस. कट्यारे उपस्थित होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून जळगाव शहर अध्यक्ष प्रा. डॉ. सत्यजित साळवे, जिल्हा प्रधान सचिव विश्वजीत चौधरी होते.

यानंतर विश्वजीत चौधरी यांनी, डॉ. दाभोलकर यांचा दहा वर्षांपूर्वी झालेल्या खून प्रकरणाची तसेच दहा वर्षात या खून खटल्यात तपास यंत्रणांनी केलेल्या दिरंगाईविषयी माहिती सांगितली. प्रा. डॉ. सत्यजित साळवे यांनी, हिंसामुक्त समाज निर्मितीसाठी कायम प्रयत्न करीत राहू. त्यासाठी समाजसुधारकांच्या विचारांवर विश्वास ठेवत परिवर्तनवादी कार्य असेच पुढे करत राहूया असे सांगितले.

न्यायाधीशांकडून तपास यंत्रणांवर ताशेरे

निकालात न्यायाधीशांनी तपास यंत्रणांवर ताशेरे ओढलेले आहेत. या खुनाचा मास्टरमाइंड शोधण्यात तपास यंत्रणांकडून चूक झाली की तपास यंत्रणांवर बाह्य शक्तीचा दबाव होता अशी शंका येते असे निकाल पत्रात नमूद केलेले आहे अशी माहिती देत, उच्च न्यायालयात आव्हान देऊन या वैचारिक खुनाचे कटकारस्थान उघडकीस आणावे अशी अपेक्षा प्रा. कट्यारे यांनी व्यक्त केली.

दोषी अधिकाऱ्यांची चौकशी व्हावी

खरे आव्हान दोषींना शिक्षा व्हावी हे नसून लोकशाही व्यवस्था मानणारा, निर्भय आणि नीतिमान,हिंसेला कुठलिही जागा नसलेला समाज निर्माण करणे हे आहे. मात्र प्रशासकीय यंत्रणा संविधानाला धोका देणारी आहे. तपास यंत्रणा निष्काळजी आहे असे जर निकालात नमूद असेल तर दोषी अधिकाऱ्यांची चौकशी झाली पाहिजे. सर्व पुरोगामी आणि परिवर्तनवादी संस्थांनी एकमेकांना साथ सहयोग करीत कृतीशील राहिले पाहिजे असे मत डॉ. मिलिंद बागुल यांनी व्यक्त केले.

यांची होती उपस्थिती

नंदकुमार भारंबे यांनीही त्यांचे अध्यक्षीय मनोगत व्यक्त केले. सूत्रसंचालन जितेंद्र धनगर यांनी तर आभार कल्पना चौधरी यांनी मानले. निर्धार सभेत प्राचार्य शांताराम बडगुजर, बापूराव पानपाटील, महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे जिल्हा पदाधिकारी अड. भरत गुजर, शिरीष चौधरी यासह विविध संस्था संघटनांचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शहर शाखेचे पदाधिकारी कल्पना चौधरी, सुभाष सपकाळे, जगदीश सपकाळे, हेमंत सपकाळे आदींनी परिश्रम घेतले.

हेही वाचा –

Back to top button