Rahul Gandhi : राहुल गांधींनी भाषणाची सुरूवात ‘रूमीं’च्‍या कवितेने केली, जाणून घेवूया रूमी यांच्‍याविषयी

Rahul Gandhi : राहुल गांधींनी भाषणाची सुरूवात ‘रूमीं’च्‍या कवितेने केली, जाणून घेवूया रूमी यांच्‍याविषयी

पुढारी ऑनलाईन : कवी 'रूमी' (Rumi) म्हणाले होते, जे शब्द हृदयातून येतात, ते शब्द हृदयात जातात. आज मला बुद्धीने नाही तर मनापासून बोलायचे आहे, असे म्हणत काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी सभागृहात संसदेत बोलण्यास सुरूवात केली. राहुल गांधी यांनी आज (दि.९) अविश्‍वास प्रस्‍तावावर बाेलण्‍यास रूमी यांच्‍या  कवितेतून प्रारंभ केला. जाणून घेऊया रूमी यांच्‍याविषयी …

मौलाना जलालुद्दीन रुमी  यांना रूमी किंवा मौलाना रूमी म्हणून ओळखले जाते. ते तेराव्या शतकातील पर्शियन कवी हाेते. इस्लामिक विद्वान, धार्मिक शिक्षक आणि सुफी संत होते. त्यांच्या बहुतांश रचना केवळ पर्शियन भाषेत आहेत. मस्नवि-ए मानवी हा त्‍यांचा काव्यग्रंथ प्रसिद्ध आहे.

मराठी विश्‍वकोषातील माहितीनुसार, रूमी (Rumi) हे सुप्रसिद्ध इस्लामी सूफी कवी होते. फार्सी भाषेत लेखन. मूळ नाव जलालुद्दीन महंमद पण रूमी आणि मौलाना म्हणून त्यांना ओळखले जाते. अफगाणिस्तानातील वाल्ख येथे त्यांचा जन्म झाला. त्यांचे वडील बहाउद्दीन वलद हे प्रसिद्ध धर्मोपदेशक आणि सूफी होते.

रूमी(Rumi) लहान असतानाच मंगोलांच्या भीतीमुळे आणि अन्य काही वादांमुळे रूमी यांचे वडील बाल्खमधले आपल्या कुटूंबाचे वास्तव्य संपवून ठिकठिकाणी फिरत फिरत अखेरीस कोन्या येथे स्थायिक झाले. १२३१ मध्ये बहाउद्दीन यांचा मृत्यू झाला.  कोन्या येथेच रूमी यांची भेट त्याच्या वडिलांचे शिष्य बुऱ्हानुद्दीन यांच्याशी झाली. त्यांनी रूमी यांना सूफी तत्वज्ञानाचे सखोल ज्ञान दिले. अध्ययन पूर्ण करण्यासाठी रूमी तेव्हाची अध्ययनकेंद्रे असलेल्या आलेप्पो आणि दमास्कस येथेही गेले.

रूमी अनेक धार्मिक विषयांवर प्रवचने देत असत. १२४४ मध्ये शम्स तबरीझा या प्रभावी व्यक्तिमत्वाच्या फिरत्या दरवेशांची आणि रूमीची गाठ पडली. या दरवेशामुळेचरूमी हे ईश्वराचा एकनिष्ठ भक्त बनले. काही दिवसांनी शम्स अचानक निघून गेल्यामुळे रूमी अतिशय अस्वस्थ झाले. शम्स तबरीझी परतले आणि पुन्हा १२४७ मध्ये अंतर्धान पावले. शम्सच्या विरहावर रूमी यांनी भावपूर्ण गझला लिहिल्या. रूमी हे अतिशय उमद्या मनाचे आणि उदार अंतःकरणाचा होते. त्याच्या ठायी श्रेष्ठ-कनिष्ठ भाव नव्हता. सर्वांशी वागण्याची त्याची रीत प्रेमळ होती. निरनिराळी मते व धर्म यांच्यात सलोखा असावा, असा उपदेश ते आपल्‍या प्रवचनातून देत असत. त्याचे आचरणही ह्या भूमिकेनुसार होती.

फीहि-मा-फीह, मजालिस-ए-सबा आणि मक्तूबात (पत्रे) हे त्याचे गद्यलेखन आहे. फीहि-मा-फीह् यात वेगवेगळ्या धार्मिक व सूफी विषयांवरील प्रवचने आहेत. ए. जे. अरबेरी यांनी डिस्कोर्सेस ऑफ रूमी (१९६१) या नावाने फीहि-मा-फीह्चे इंग्रजी भाषांतर केले आहे. मजालिस-ए-सबामध्ये रूमीची प्रबोधनपर भाषणे आहेत. रूमी यांची पत्रे इस्तंबूल येथे प्रकाशित झाली आहेत (१९३७). सहा खंडात प्रसिद्ध झालेल्या मस्नवि-ए मानवी या काव्यग्रंथामुळे रूमी यांना कीर्ती लाभली. हे सर्व खंड भाष्यासह संपादित केले गेले. आर्.ए.निकल्सन (१९२४–४०) यांनी मस्नवीचे सटीक इंग्रजी भाषांतर केले. मस्नवीची तुर्की, उर्दू, फार्सी भाष्येही विपुल झाली आहेत. बदीउज्जमान फ्रुजानफर याने रूमी यांच्‍या  गझल  आणि व रूबाया यांचे आठ खंडांत (१९५७–६१) संपादन केले.

हेही वाचा :

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news