वखार महामंडळाच्या भरतीचा प्रश्न दोन दिवसांत सोडवणार ; पणनमंत्री अब्दुल सत्तार यांची माहिती | पुढारी

वखार महामंडळाच्या भरतीचा प्रश्न दोन दिवसांत सोडवणार ; पणनमंत्री अब्दुल सत्तार यांची माहिती

पुणे : प्रतिनिधी :  राज्य सरकारच्या फायद्यात असणार्‍या महामंडळात महाराष्ट्र राज्य वखार महामंडळाचा समावेश आहे. महामंडळाचे राज्यभर कामकाज असून, केवळ 435 कर्मचार्‍यांवर ते अवलंबून आहे. राज्य सरकारने 302 कर्मचारी भरतीस मान्यता दिली असली, तरी त्यावर पुढील दोन दिवसांत अंतिम निर्णय घेतला जाईल, अशी ग्वाही पणनमंत्री अब्दुल सत्तार यांनी दिला. त्यामुळे कर्मचारी भरतीचा रखडलेला प्रश्न निकाली निघण्याची अपेक्षा आहे.

महामंडळाच्या 66 व्या वर्धापन दिनानिमित्त बालगंधर्व रंगमंदिरात मंगळवारी (दि. 8) झालेल्या कार्यक्रमात सत्तार बोलत होते. या वेळी व्यासपीठावर महामंडळाचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक दीपक तावरे, सहव्यवस्थापकीय संचालक व सचिव रमेश शिंगटे, राज्याचे पणन संचालक शैलेश कोतमिरे, पणन मंडळाचे व्यवस्थापकीय संचालक संजय कदम, महाव्यवस्थापक अविनाश पांडे यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित होते. या वेळी महामंडळाचे ठेवीदार, संस्था ठेवीदार, उत्कृष्ट विभागीय कार्यालये व वखार केंद्रे आणि विशेष कामगिरी करणार्‍या कर्मचार्‍यांचा सत्कार करण्यात आला.

सत्तार म्हणाले, की विकास सोसायट्यांकडून पीककर्ज मिळवितानाही शेतकर्‍यांना हेलपाटे मारावे लागतात. मात्र, वखार महामंडळ शेतमाल तारण आणि ब्लॉकचेन तंत्रज्ञानाद्वारे अर्ध्या तासात राज्य बँकेच्या सहकार्याने शेतकर्‍यांना तारण कर्ज देत आहे, ही खरोखरंच कौतुकास्पद बाब आहे. मात्र, तारणावरील व्याजदर 9 टक्क्यांऐवजी 6 टक्क्यांपर्यंत आणून शेतकर्‍यांना मदत करता येऊ शकते का, यावर बैठक घेऊन चर्चा करू, असेही ते म्हणाले.

माझ्या नावातच ‘सत्ता’ असल्याने 4 वेळा मंत्रिपद
शेतकर्‍यांच्या हितासाठी काम करणार्‍या वखार महामंडळाच्या प्रश्नांवर बैठक लावली जाईल, असे नमूद करून अब्दुल सत्तार म्हणाले, की माझ्या नावातच सत्ता आहे. माझा बिस्मिला करायची दुआ अनेक जण करतात. पण ते शक्य नाही. राज्याच्या पाच मुख्यमंत्र्यांच्या कार्यकाळात मी चार वेळा मंत्री राहिलेलो आहे. तसेच विविध 19 खात्यांचा कारभारही पाहिला आहे.

हेही वाचा :

अखेर कात्रज-कोंढवा रस्त्यावरील इस्कॉन चौकातील कोंडी फुटणार..!

महत्त्वाची बातमी ! तलाठीपदाच्या परीक्षेचे वेळापत्रक, तारखा जाहीर

Back to top button