कोल्हापूर: देशसेवेतील जावयाला ऑनलाईन दिला ‘जावई वाण’; उदगावच्या ठोमके कुटुंबियांचा अधिक मासात आहेर | पुढारी

कोल्हापूर: देशसेवेतील जावयाला ऑनलाईन दिला ‘जावई वाण’; उदगावच्या ठोमके कुटुंबियांचा अधिक मासात आहेर

संतोष बामणे

जयसिंगपूर: मजले (ता. हातकणंगले) येथील अनिकेत रमेश जाधव हा युवक सैन्य दलात आहेत. त्याचे 5 महिन्यापूर्वी उदगाव (ता.शिरोळ) येथील साक्षी प्रकाश ठोमके हिच्याबरोबर लग्न झाले आहे. लग्नाच्या महिन्याभरानंतर अनिकेत हा पुन्हा देशाच्या सेवेत रुजू झाला आहे. सध्या अधिक महिना असल्याने घराघरात जावईपणाचे वाण दिले जात आहे. तर अनिकेत सैन्य दलात असल्याने साक्षी हिला माहेरपणाला बोलवून तिला जावई वाण दिला. यावेळी अनिकेत हा प्रत्यक्षात उपस्थित नसला तरी व्हिडिओ कॉलद्वारे ऑनलाईन जावयाला जावई वाण देऊन मानपान केला.

अनिकेत जाधव हा गेल्या 6 वर्षापूर्वी सैन्य दलात भरती झाला आहे. गेल्या 5 महिन्यापूर्वी त्याचे लग्न झाले आहे. लग्नानंतर तो पुन्हा जम्मू येथे आपल्या सेवेत रूजू झाला आहे. गेल्या काही दिवसापासून अधिक मासाला सुरुवात झाली आहे. या अधिक मासात लेक व जावयाला बोलावून माहेरकडून आहेर माहेर व गोडधोड करून पाठविण्याची रीत आहे. त्याप्रमाणे अनिकेत याच्या पत्नीला अधिक मास पाळण्यासाठी उदगाव येथे आणण्यात आले होते.

काही दिवस अधिक मास पाळण्यानंतर पुन्हा सासरी जाण्यापूर्वी लेक व जावयाला आहेरमाहेर, चांदीच्या वस्तू व गोडधोड देण्याची प्रथा आहे. तर जावई मात्र देशसेवेत असल्याने आई सविता व वडील प्रकाश ठोमके यांनी मुलीला मुलीकडे आहेर माहेरच्या साहित्य सुपुर्त केल्या आणि देशाच्या सीमेवर सेवा बजावत असलेल्या अनिकेतला व्हिडिओ कॉलद्वारे ओवाळणी करून सर्व साहित्य मुलगीच्या ओट्यात देऊन मानपान केला.

एकीकडे देशाच्या सुरक्षितेसाठी सेवा बजावणार्‍या अनिकेतला सणवार हे सीमेवर साजरे करायला लागतात. अशातच अधिक मासातील मानपान ऑनलाईन केल्याने देशाची सेवा करीत असतानाही ऑनलाई का असेना मला सासरवाडीकडून केलेला अधिक मासातील जावई वाण स्फूर्ती देणारा असल्याचे अनिकेत जाधव यांनी सांगितले. अनिकेत याची सासू सविता ठोमके या उदगावच्या माजी सरपंच आहेत.

हेही वाचा 

Back to top button