कोल्हापूर: ‘शाहूवाडी’त शिक्षकांची तब्बल २०३ पदे रिक्त | पुढारी

कोल्हापूर: 'शाहूवाडी'त शिक्षकांची तब्बल २०३ पदे रिक्त

सुभाष पाटील

विशाळगड:
शाहूवाडी तालुक्याच्या शिक्षण विभागात एकूण मंजूर असलेल्या ८८४ पदांपैकी तब्बल २२६ पदे रिक्त आहेत. यामध्ये विद्यार्थ्यांना शिकवणाऱ्या शिक्षकासह विस्तार अधिकारी, केंद्रप्रमुख आणि मुख्याध्यापक या जागाही मोठ्या प्रमाणात रिक्त जागा आहेत. त्यामुळे बहुतांश शाळांमध्ये शिक्षकांची कमतरता आहे. यापैकी मुख्याध्यापक, पदवीधर आणि उपशिक्षक यांच्या ८५५ मंजूर पदांपैकी २०३ पदे रिक्त असल्याने याचा परिणाम विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्तेवर होण्याची शक्यता आहे.

विस्तार अधिकाऱ्यांच्या जागा रिक्त :

शिक्षण विभाग व शिक्षकांवर नियंत्रण ठेवण्यासाठी आवश्यक असणाऱ्या विस्तार अधिकाऱ्यांच्या ६ पैकी ४ जागा रिक्त आहेत. केंद्रप्रमुखांच्या २३ जागांपैकी तब्बल १९ जागा, तर मुख्याध्यापकांच्या २६ पैकी तब्बल ९ जागा रिक्त आहेत. वास्तविक विस्तार अधिकारी, केंद्र प्रमुखांच्या माध्यमातून तर केंद्रप्रमुख मुख्याध्यापकांच्या माध्यमातून शिक्षण व्यवस्थेवर नियंत्रण ठेवत असतात. परंतु या ५५ मंजूर पदांपैकी तब्बल ३२ जागा रिक्त आहेत. त्यामुळे शिक्षण व्यवस्थेवर लक्ष ठेवणे अवघड जात आहे.

 रिक्त जागा भरण्याची मागणी :

एकंदर, तालुक्यात शिक्षकांची कमतरता तर आहेच. परंतु त्यापेक्षा शिक्षण व्यवस्थेवर नियंत्रण ठेवणाऱ्या अधिकाऱ्यांची कमतरता मोठ्या प्रमाणात आहे. यामुळे शिक्षण व्यवस्थेवर मोठ्या प्रमाणात ताण येत असून, बहुतांश शाळांमध्ये शिक्षकांचा तुडवडा आहे. तर, काही शाळांमध्ये एकच शिक्षक सर्व वर्ग सांभाळत आहेत. अशीही परिस्थिती आहे.  ही परिस्थिती शैक्षणिक गुणवत्तेच्या दृष्टीने घातक असल्याने रिक्त जागा त्वरित भरण्यात याव्यात, अशी मागणी होत आहे.

सहनियंत्रण समिती कार्यरत :

दरम्यान, तालुक्याच्या शिक्षण व्यवस्थेवर नियंत्रण ठेवण्यासाठी शाहूवाडी तालुका शिक्षण सनियंत्रण समिती कार्यरत आहे. या समितीमध्ये प्रशासकीय अधिकारी, शिक्षक प्रतिनिधी, लोकप्रतिनिधी, तज्ञ मंडळीचा समावेश आहे. या समितीच्या माध्यमातून शिक्षण व्यवस्थेवर नियंत्रण ठेवले जात आहे.

शाहुवाडीत जिपच्या २६३ शाळा :

तालुक्यात जिल्हा परिषदेच्या एकूण २६३ शाळा असून यामध्ये १३, हजार ३३७ विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. यासाठी १८९ पदवीधर व ६४० उपशिक्षक असे एकूण ८२९ शिक्षकांची पदे मंजूर आहेत. प्रत्यक्षात मात्र ११२ पदवीधर व ५२३ उपशिक्षक असे एकूण ६३५ शिक्षक सद्यस्थितीत कार्यरत आहेत. तर ७७ पदवीधर व ११७ उपशिक्षक असे एकूण १९४ शिक्षकांच्या जागा रिक्त आहेत.

तरीही काही शिक्षकाकडून मिळतोय आशेचा किरण :

दरम्यान,  शिक्षण व्यवस्थेवर नियंत्रण ठेवणाऱ्यांची संख्या कमी असली तरी काही शिक्षक स्वयंपूर्तीने काम करत असल्याने ते कार्यरत असलेल्या शाळेतील विद्यार्थी अन शाळेची स्थितीही उत्तम असल्याचे दिसते. तसेच काही शिक्षक एकापेक्षा जास्त वर्ग सांभाळूनही विद्यार्थ्यांची गुणवत्ता उत्तम आहे. त्यामुळे वरिष्ठांची संख्या कमी व शिक्षकांची कमतरता असली तरी अशा शिक्षकांमुळे मात्र आशेचा किरण मिळत आहे.

तालुक्यासह कोल्हापूर जिल्ह्यात शिक्षकांचा तुटवडा असून मुख्याध्यापक, केंद्रप्रमुख यांची अनेक पदे रिक्त आहेत. याकडे प्रशासनाचाही कानाडोळा होत असल्याने वर्षानुवर्षे ही पदे भरली जात नाहीत. प्रशासनासह लोकप्रतिनिधीमध्ये ही यासंदर्भात उदासीनता दिसत असल्याने त्याचा परिणाम शैक्षणिक गुणवत्तेवर होण्याची शक्यता असते. जिल्हा परिषद शाळांची शिक्षण व्यवस्था सक्षम करायचे असेल तर रिक्त पदे भरणे आवश्यक आहे.
– एक निवृत्त शिक्षक

 

तालुक्यात शिक्षकांची पदे मोठ्या प्रमाणात रिक्त आहेत. जोपर्यंत शासन शिक्षक भरती करत नाहीत. तोपर्यंत विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये, म्हणून सेवानिवृत्त शिक्षकांना प्राधान्य देऊन भरती केली जाईल, एकंदरीत विद्यार्थ्यांना दिलासा देण्याचा प्रयत्न सुरू आहे.
– विश्वास सुतार, गटशिक्षणाधिकारी, शाहूवाडी

 

संवर्गनिहाय रिक्त पदांची माहिती :

संवर्ग                      मंजूर पद      कार्यरत पद     रिक्त पद
विस्तार अधिकारी           ६               २                    ४

केंद्रप्रमुख                    २३               ४                  १९

मुख्याध्यापक               २६            १७                     ९

पदवीधर-                   १८९         ११२                    ७७

उपशिक्षक-                ६४०         ५२३                  ११७
एकूण                        ८८४        ६५८                 २२६

एकूण जि प शाळा  :  २६३
तालुक्यातील विद्यार्थी संख्या : १३,३३७

हेही वाचा 

Back to top button