कोल्हापूर : कौटुंबिक वादातून तरुणाने पंचगंगेत घेतली उडी | पुढारी

कोल्हापूर : कौटुंबिक वादातून तरुणाने पंचगंगेत घेतली उडी

इचलकरंजी : पुढारी वृत्तसेवा – पंचगंगा नदीपात्रात मोठ्या पुलावरुन एका तरुणाने उडी मारली. विनोद शब्बीर शिकलगार (वय २९, रा. यड्राव फाटा परिसर) असे त्याचे नाव आहे. बारा वर्षीय पुतण्यासमोरच त्याने नदीत उडी मारली. विनोद यांचा शोध घेण्याचे काम महापालिका आपत्तकालीन व्यवस्थापनाकडून करण्यात येत आहे. या घटनेची माहिती कळताच घटनास्थळी आलेल्या विनोदच्या पत्नीनेसुद्धा नदीत उडी मारण्याचा प्रयत्न केला. परंतु नातेवाईकांनी तिला पकडले. त्यामुळे दुसरा अनर्थ टळला. घरगुती वादातून ही घटना घडल्याचा प्राथमिक अंदाज आहे.

याबाबत मिळालेली माहिती अशी, यड्राव फाटा परिसरात विनोद शिकलगार हा कुटुंबासह राहण्यास असून तो यंत्रमाग कामगार आहे. मंगळवारी सकाळच्या सुमारास विनोद हा आपला पुतण्या गणेश याला मोटरसायकलवरुन घेऊन घरातून बाहेर पडला. पंचगंगा नदीवरी मोठ्या पुलावर आल्यानंतर मध्यभागी विनोदने मोटरसायकल थांबविली. त्यावेळी त्याने आपल्या बहिणीला फोन लावला आणि मोबाईल बोलण्यासाठी गणेश याच्याकडे दिला.

त्याच दरम्यान विनोद याने पुलावरुन थेट नदीत उडी मारली. या घटनेमुळे घाबरलेल्या गणेशने आरडाओरडा सुरु केला. त्यामुळे घटनास्थळी नागरिक जमा झाले. पण तोपर्यंत विनोद हा पाण्याच्या प्रवाहात वाहून गेला. या घटनेची माहिती मिळताच विनोद याच्या पत्नीसह नातेवाईक घटनास्थळी धाव घेतली. त्यावेळी विनोदच्या पत्नीनेसुध्दा नदीत उडी मारण्याचा प्रयत्न केला. परंतु नातेवाईकांनी प्रसंगावधान राखत त्यांना रोखल्याने अनर्थ टळला. घरगुती कारणातून विनोद याने हे कृत्य केल्याचा पोलिसांचा अंदाज आहे.

महानगरपालिकेच्या आपत्कालीन विभागाच्या पथकाकडून विनोद याचा शोध घेण्यात येत होता. घटनास्थळी नातेवाईकांचा आक्रोश सुरु होता. विनोद हा घरातून बाहेर पडताना आपल्या बहिणींना तसेच काही नातेवाईकांना फोन केला होता. विनोदच्या अशा कृत्यामुळे नातेवाईकांना धक्का बसला आहे.

Back to top button