जालन्याचे माजी खासदार पुंडलिक हरी दानवे यांचे निधन | पुढारी

जालन्याचे माजी खासदार पुंडलिक हरी दानवे यांचे निधन

भोकरदन (जि.जालना); पुढारी वृत्तसेवा:  जालन्याचे माजी खासदार पुंडलिक हरी दानवे ( वय ९०) यांचे सोमवारी (दि.१) रोजी सकाळी साडेदहा वाजता औरंगाबाद येथे निधन झाले. त्यांच्या पत्नी केशरबाई यांचे दोन दिवसापूर्वी निधन झाले होते.

भोकरदन येथील राष्ट्रवादीचे माजी आमदार चंद्रकांत दानवे आणि युवा नेते सुधाकर दानवे यांचे ते वडील होते. त्यांच्या पार्थिवावर मंगळवारी (दि. २) रोजी भोकरदन तालुक्यातील पिंपळगाव सुतार या त्यांच्या मूळगावी अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

माजी खासदार पुंडलिक हरी दानवे यांचा जनसंघ, जनता पार्टी, भारतीय जनता पार्टी असा त्यांचा राजकीय प्रवास राहिला आहे. १९७७ आणि ८९ च्या निवडणुकीत त्यांनी जालन्याचे प्रतिनिधीत्व केले होतं. गेल्या कित्येक वर्षापासून ते सक्रिय राजकारणातून निवृत्त झाले आहेत. पण नव्वदीत देखील त्यांचे शारिरीक व मानसिक स्वास्थ ठणठणीत असल्याने ते गावाकडच्या शेतात जाऊन काम करत होते.

भोकरदनचे तत्कालीन आमदार विठ्ठलराव अण्णा सपकाळ यांच्या निधनानंतर २००२ च्या भोकरदन विधानसभा पोटनिवडणुकीत पुंडलिक हरी दानवे आणि चंद्रकांत दानवे पिता पुत्रांनी भारतीय जनता पक्ष सोडला आणि ते राष्ट्रवादीत प्रवेश केला.

जिल्ह्यातील दिवंगत नेते अंकुशराव टोपे यांनी दोन दानवेंच्या राजकीय विरोधाचा फायदा घेत चंद्रकांत दानवे यांना राष्ट्रवादीत प्रवेश देऊन पोट निवडणुकीत भोकरदन विधानसभा मतदार संघातून उमेदवारी दिली. एवढेच नाही तर पूर्ण राजकीय ताकद पणाला लावून चंद्रकांत दानवे यांना निवडूनही आणले. त्यानंतर चंद्रकांत दानवे हे सलग तीनवेळा आमदार झाले. त्यांनी भाजपच्या शिवाजीराव थोटे यांचा दोनवेळा तर रावसाहेब दानवे यांच्या पत्नी निर्मलाताई दानवे यांचा एकदा पराभव केला होता.

हेही वाचलंत का? 

Back to top button