

मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी केलेल्या 100 कोटी वसुली, भ्रष्टाचार आणि गैरकारभाराच्या आरोपावरुन सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) दाखल केलेल्या गुन्ह्यात चौकशीसाठी राज्याचे माजी गृहमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अनिल देशमुख हे अखेर सोमवारी ईडी कार्यालयात हजर झाले. ते गेल्या काही महिन्यांपासून नॉट रिचेबल होते.
अनिल देशमुख यांच्यावर करण्यात आलेल्या गंभीर आरोपांवरुन मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशाने सीबीआयने प्राथमिक तपास करुन गुन्हा दाखल केला. याच गुन्ह्याच्या आधारे ईडी याप्रकरणी मनी लाँड्रिंगचा गुन्हा दाखल करुन तपास करत आहे. ईडीने याप्रकरणात देशमुखांचे खासगी सचिव संजीव पालांडे आणि स्वीय सहाय्यक कुंदन शिंदे यांना अटक केली आहे. तसेच देशमुख यांची मालमत्तासुद्धा जप्त केली आहे.
ईडी या प्रकरणात विशेष ईडी न्यायालयात 14 जणांविरोधात सुमारे 04 हजार 500 पानांचे आरोपपत्र दाखल केले आहे. या आरोपपत्रात देशमुखांविरोधात अनेक महत्वाचे पुरावे आहेत. मात्र वारंवार समन्स बजावूनही देशमुख हे चौकशीला हजर राहीले नाहीत आणि ते न्यायालयीन लढाई लढत असल्याने त्यांचा नेमका सहभाग स्पष्ट होत नसल्याने या आरोपपत्र त्याचे नाव ईडीने सांगितले होते.
न्यायालयात धाव घेऊनही दिलासा मिळत नसल्याने गेले काही महिने नॉट रिचेबल असलेले अनिल देशमुख हे सोमवारी ईडी कार्यालयात चौकशीला हजर झाले. त्यांच्या सोबत त्यांचे वकील आहेत.
अजूनही माझी केस सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित आहे. मी स्वतः ईडीच्या कार्यालयात हजर झालो. ज्या परमबीर सिंग यांनी माझ्यावर आरोप केले ते आज कुठे आहेत? आरोप करणाराच पळून गेला. ईडीला संपूर्ण सहकार करणार आहे, अशी प्रतिक्रिया अनिल देशमुख यांनी दिली आहे. मी सरळमार्गाने, नैतिकतेच्या मार्गाने चालणारा माणूस आहे. मा. उच्च न्यायालयाने माझ्या संविधानातील अधिकारात मला विशेष कोर्टात जाण्याचे स्वातंत्र दिले असतानाही मी आज ईडीच्या कार्यालयात जाऊन चौकशीसाठी संपुर्ण सहकार्य करणार आहे, असे देशमुख यांनी म्हटले आहे.
देशमुखांच्या घरी ईडी, सीबीआय आणि आयकर विभागाने अनेकवेळा छापेमारी केली आहे. महिनाभरापासून अधिक काळ ते अज्ञातस्थळी होते. न्यायालयाने देखील त्यांना समन्स जारी करून ईडीच्या चौकशीसाठी का हजर राहत नाही? याबाबत विचारणा केली होती. मात्र, अनिल देशमुख नेमके कुठे आहेत? याचा थांगपत्ता लागलेला नव्हता. अखेर आज ते ईडी कार्यालयात दाखल झाले असल्याची माहिती मिळाली आहे.
दरम्यान, अनिल देशमुख यांच्या कार्यकाळात करण्यात आलेल्या बदल्या आणि पोस्टिंगमध्ये मध्यस्थ असल्याच्या आरोपांतून केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआय) संतोष जगताप याला रविवारी ठाण्यातून अटक केली आहे. सीबीआयने दाखल केलेल्या गुन्ह्यातील ही पहिलीच अटक असून न्यायालयाने जगतापला 4 नोव्हेंबरपर्यंत सीबीआय कोठडी सुनावली आहे. सीबीआयने याप्रकरणात राज्याचे मुख्य सचिव सीताराम कुंटे आणि पोलीस महासंचालक संजय पांडे यांनाही चौकशीला हजर राहण्यासाठी समन्स बजावले आहे.
सीबीआयने अटक केलेला जगताप हा ठाणे येथे राहात होता. देशमुखांच्या काळात झालेल्या बदल्या आणि पोस्टिंगमध्ये तो मध्यस्थ म्हणून काम करत होता. त्याच्या घरावर करण्यात आलेल्या छापेमारीमध्ये 9 लाख रुपयांची रोख रक्कम सीबीआयच्या हाती लागली आहे. त्याआधारे सीबीआय जगताप याच्याकडे कसून चौकशी करत असून येत्या काळात सीबीआयच्या अडचणी आणखी वाढण्याची शक्यता आहे.