रस्ता खचल्याने वाहतुकीस धोका ; निकृष्ट दर्जाचे काम केल्याने दुरवस्था | पुढारी

रस्ता खचल्याने वाहतुकीस धोका ; निकृष्ट दर्जाचे काम केल्याने दुरवस्था

वारजे : पुढारी वृत्तसेवा : वारजेतील स्व. रमेश वांजळे हायवे चौक येथून रामनगर व गावठाणकडे जाणार्‍या मुख्य रस्त्यावर महापालिकेच्या मुख्य खात्याकडून मोठ्या व्यासाची ड्रेनेज वाहिनी टाकण्यात आली होती. त्यानंतर जवळपास तीन महिन्यांंनी रस्त्याची
तात्पुरत्या स्वरूपात दुरुस्ती करण्यात आली. मात्र, अवघ्या सहा महिन्यांतच येथील रस्ता खचून धोकादायक बनला आहे. हा रस्ता वाहतुकीस धोकादायक असल्याने या ठिकाणच्या रस्त्याची तातडीने दुरुस्ती करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.

वाहतुकीच्या दृष्टीने महत्त्वाचा असलेल्या या वारजे गावठाण मुख्य रस्त्यावर ठेकेदाराकडून भूमिगत ड्रेनेज वाहिनीचे काम करण्यात आले. पाइपलाइनसाठी खोदण्यात आलेल्या रस्त्याची तात्पुरत्या स्वरूपात दुरुस्ती करण्यात आली होती. मात्र, रस्त्याचे काम केलेल्या ठिकाणीच रस्ता खचू लागला होता. प्रशासनाला याबाबत पूर्वकल्पनादेखील देण्यात आली. तरीही याकडे दुर्लक्ष करण्यात आले. सध्या पावसाळा सुरू असून, रस्ता खचलेल्या ठिकाणी पालिकेच्या मुख्य खात्याकडील पथ विभागाने या काम केलेल्या व खचलेल्या रस्त्याची दुरुस्ती न करता त्या ठिकाणी डांबरीकरण करण्यात आले. त्यानंतर अवघ्या आठवडाभरातच खचलेल्या ठिकाणावरून वाहने गेल्याने त्या ठिकाणी मोठे भगदाड पडले आहे. या ठिकाणावरील चेंबरची झाकणेदेखील योग्य दर्जाची नसल्याने ती अल्पावधीतच तुटतात. हा रस्ता वाहतूक वर्दळीच्या दृष्टीने मुख्य रस्ता असल्याने या रस्त्याची योग्य ती दुरुस्ती करून हा रस्ता पूर्ववत करण्यात यावा, अशी मागणी केली जात आहे.

या रस्त्याच्या कामाची निविदा प्रक्रिया सुरू आहे. रस्त्याची पाहणी करून तातडीने योग्य ती उपाययोजना केली जाईल.
                                               – पीयूष बोंडे, अभियंता, पथ विभाग, पुणे मनपा

हेही वाचा :

Back to top button