पुणे- नाशिक महामार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा ; बंद पडलेल्या कंटेनरवर दोन टेम्पो आदळले | पुढारी

पुणे- नाशिक महामार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा ; बंद पडलेल्या कंटेनरवर दोन टेम्पो आदळले

कोंडीभाऊ पाचारणे

राजगुरूनगर : पुढारी वृत्तसेवा : पुणे-नाशिक महामार्गावर राजगुरूनगर लगतच्या चांडोली टोल नाक्याजवळ बंद पडलेल्या कंटेनरला दोन आयशर टेम्पो धडकून जोरदार अपघात झाला. गुरुवारी (दि. २७) सकाळी सहाच्या सुमारास हा अपघात घडला. दुध वाहतूक करणारे दोन्ही आयशर टेम्पो एकाच गावातील म्हणजेच चांडोली येथील आहेत. पुण्याच्या बाजूने हे दोन्ही टेम्पो राजगुरूनगर बाजूकडे येत होते. टोल नाक्याजवळ रस्त्यात बंद पडलेल्या कंटेनर वर पहिला टेम्पो धडकला. मागून येणारा त्यावर आदळला. अपघातात वाहनांचे मोठे नुकसान झाले. अपघातात चालक ओंकार सावंत आणि गणेश दांगट गंभीर जखमी झाले आहेत. त्यांना भोसरी येथील साईनाथ रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

रस्त्यात अपघात होऊन जागेवरच वाहने अडकून पडली. त्यामुळे भल्या सकाळी वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. टोल नाका ते शिरोली परीसरात एक बाजूने  वाहतूककोंडी झाली होती. प्रवासी, वाहनचालकांना जवळपास दोन तास जागेवरच वाहने उभी करावी लागली. वाहतूक पोलिसांनी नागरिकांच्या मदतीने वाहने रस्त्यातून बाजूला केली.

हेही वाचा :

पुणे : ‘उड्डाण’अंतर्गत 15 विमानसेवा सुरू करणार

अहमदनगर तालुक्यात 85 टक्के पेरण्या

Back to top button