रायगड : महाडमध्ये मुसळधार, सतर्कतेचा इशारा; काळ- सावित्री नदी दुथडी वाहू लागली | पुढारी

रायगड : महाडमध्ये मुसळधार, सतर्कतेचा इशारा; काळ- सावित्री नदी दुथडी वाहू लागली

महाड; पुढारी वृत्तसेवा : मागील २४ तासापासून महाड शहरासह तालुक्याच्या विविध भागात मुसळधार पर्जन्यवृष्टी सुरू असून तालुक्यातील प्रमुख असणाऱ्या सावित्री, काळ, गांधारी तिन्ही नद्या दुथडी भरून वाहू लागले आहेत. स्थानिक प्रशासनाने नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. दरम्यान पाण्याची पातळी ५. २० मीटर एवढी असल्याचे नगरपालिका प्रशासनाने सांगितले आहे.

मागील २४ तासापासून महाड शहरासह तालुक्याला पावसाने झोडपून काढले असून तालुक्यातील सावित्री, काळ व गांधारी या तिन्ही नद्या भरून वाहत आहेत. परिसरात होणाऱ्या मुसळधार पावसाने नदीचे पात्र दुथडी भरून वाहत असल्याचे चित्र सर्वत्र पाहायला मिळत आहे. तालुक्यातील वाळण कुंडाजवळ दिलेल्या प्रत्यक्ष भेटीदरम्यान नदीपात्रातून जाणाऱ्या वेगवान पाण्याचा आवाज थरकाप उडवणारा असल्याचे निदर्शनास आले.

गेल्या २४ तासात गोठे येथील चंद्रशेखर चंद्रकांत मांजरेकर यांचे घर पडले असून यात कोणीतीही जिवीतहानी झाली नसल्याची माहिती आपत्ती प्रशासनाकडून प्राप्त झाली आहे. स्थानिक प्रशासनाने सकाळपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांना तसेच व्यापाऱ्यांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. ध्वनिक्षेपकावरून शहराच्या विविध भागात या संबंधातील माहिती नगरपालिका प्रशासनामार्फत दिली जात आहे. पावसामुळे महाडमधील काही शाळांना संबंधित व्यवस्थापनाकडून सुट्टी देण्यात आले असेही सांगण्यात आले आहे.

हेही वाचा : 

Back to top button