ठेकेदारांचे शासनाकडे 620 कोटी थकीत ! नगरमध्ये आंदोलन | पुढारी

ठेकेदारांचे शासनाकडे 620 कोटी थकीत ! नगरमध्ये आंदोलन

नगर : पुढारी वृत्तसेवा :  गेल्या दोन वर्षापासून शासनाने ठेकेदारांची देयके प्रलंबित ठेवल्याने जिल्ह्यात 620 कोटी रुपये व राज्यात 9 हजार कोटी रुपयांची बिले प्रलंबित आहे. जोवर केलेल्या कामांची बिलांची रक्कम ठेकेदारांना दिली जात नाहीत, तोपर्यंत नवी कामे सुरू करू नका, असा निर्णय शासनाने घ्यावा. त्वरित बिलांची रक्कम न मिळाल्यास आम्ही कोर्टात जाऊ, असा इशारा असोसिएशनचे अध्यक्ष दीपक दरे यांनी दिला आहे.

नगर जिल्ह्यातील शासकीय ठेकेदारांनी सार्वजनिक बांधकाम विभागा मार्फत केलेल्या शासकीय विकास कामांचे कोट्यावधी रुपयांची देयके मागील दोन वर्षापासून प्रलंबित आहेत. प्रत्येक वेळी केवळ 10 ते 20 टक्के निधीच शासन अदा करत आहे. याच्या निषेधार्थ बिल्डर्स असोसिएशन ऑफ इंडियाच्या नगर शाखेच्या वतीने सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिक्षक अभियंता कार्यालयात साखळी उपोषण सुरू केले आहे. जिल्ह्यातील सुमारे 250 ठेकेदार या आंदोलनात तीन दिवसात सामील होणार आहे. यावेळी प्रलंबित देयकाच्या मागणी साठी उपोषणकर्त्यांनी जोरदार घोषणा दिल्या.

उपाध्यक्ष उदय मुंढे म्हणाले, ठेकेदारांनी केलेल्या कामांची बिले शासन पूर्णपणे न देता अर्धवट देत आहे. मंजूर कामे पूर्ण न झाल्याने अनेक विकास कामे अपूर्ण अवस्थेत आहेत. त्यामुळे नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. ही विकासकामे लवकरात लवकर पूर्ण व्हावीत यासाठी शासनाने पुढाकार घेऊन ठेकेदारांची देयके त्वरित द्यावीत. माजी अध्यक्ष महेश गुंदेचा म्हणाले, तीन दिवस राज्यस्तरीय उपोषण करीत आहोत. गेल्या दोन वर्षांपासून केलेल्या कामांचे केवळ 10 ते 20 टक्केच बिले आम्हला मिळत आहेत. त्यामुळे थकीत बिलांची रक्कम मंजूर बजेटपेक्षा वाढत चालली आहे.

जुन्या कामांचे बिल न देता शासन नवे कामे मंजूर करीत आहेत. हा प्रकार अत्यंत घातक आहेया आंदोलनात संजय गुंदेचा, निखील जगताप, ईश्वर बोरा, दिलीप जगताप, अनिल सोनावणे, कल्याण माळवदे, मिलिंद वायकर, महेश जाजू, बाळासाहेब कचरे, अमोल कदम, रामदास कल्हापुरे, बाळासाहेब मुरदारे, अनुज सोनीमंडलेचा, राहुल शिंदे, महेश गायकवाड, दादासाहेब थोरात, कार्तिक वाबळे, प्रीतम भंडारी, रोहन मांडे, आदिनाथ घुले आदींसह ठेकेदार सहभागी झाले आहेत.

आंदोलक ठेकेदारांशी चर्चा केली आहे. त्यांच्या मागण्या शासनाकडे पाठविल्या असून, प्रलंबित देयकांपोटी 500 कोटींची मागणी केलेली आहे.
                                           – भारतकुमार बावीस्कर, अधीक्षक अभियंता 

हे ही वाचा : 

नगर : ग्रामपंचायतींच्या 440 उमेदवारांवर टांगती तलवार

Maharashtra Monsoon Session 2023 : विधान परिषद उपसभापती अपात्रतेच्या मुद्द्यावरून विधानपरिषदेत गदारोळ

Back to top button