23-24 मे रोजी किल्ले रायगडावरील पायरी मार्ग राहणार बंद! | पुढारी

23-24 मे रोजी किल्ले रायगडावरील पायरी मार्ग राहणार बंद!

रायगड; पुढारी वृत्तसेवा : मागील वर्षी किल्ले रायगडावरील 350 व्या राज्याभिषेक सोहळ्यापूर्वी पायरी मार्गाने जाणाऱ्या एका पर्यटक शिवभक्ताचा दरड कोसळल्याने मृत्यू झाला होता. या पार्श्वभूमीवर रायगडचे जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी येत्या 23 व 24 रोजी या मार्गावरील महादरवाजा व परिसरातील मोकळे झालेले दगड प्रशिक्षित रॅपलर्सच्या मदतीने दूर काढण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे 23 व 24 मे दिवशी पायरी मार्ग बंद असल्याचे त्यांनी सांगितले.

प्रतिवर्षी 350 व्या राज्याभिषेक सोहळ्यापूर्वी झालेल्या दुर्घटनेमध्ये एका व्यक्तीचा झालेला मृत्यू व त्यानंतर किल्ले रायगड पायरी मार्गावरील अनेक ठिकाणी उंच कड्या नजीक असलेल्या मोकळ्या दगडांमुळे भविष्यात अशा पद्धतीची दुर्घटना घडू नये या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी तातडीने झालेल्या बैठकीमध्ये हा निर्णय घेतला असून या निर्णयास दुर्गवीर प्रतिष्ठान मुंबई याने सहमती दर्शवली आहे.

यामुळे किल्ले रायगडावरील पायरी मार्ग दिनांक 23 व 24 या दोन दिवशी बंद राहणार असून ,संभाव्य दरड आपत्ती सौम्यकरण उपाययोजनेद्वारे या मार्गावरील मोकळे दगड प्रशिक्षित रॅपलर्सच्या मदतीने काढण्यात येणार असल्याचे या पत्राद्वारे सूचित करण्यात आले आहे. यामुळे पायरी मार्गावर परिसरातील नागरिक, शिवभक्त, पर्यटक व कोणीही दोन दिवस प्रवास करू नये असे आवाहन जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी प्रसिद्धी पत्रकारद्वारे केले आहे.

Back to top button