पुण्यात चोरटे झाले उदंड; सहा घरफोड्यांत 20 लाखांचा ऐवज लंपास | पुढारी

पुण्यात चोरटे झाले उदंड; सहा घरफोड्यांत 20 लाखांचा ऐवज लंपास

पुणे; पुढारी वृत्तसेवा : बंद घरावर डल्ला मारून ऐवज लुटण्याचा सपाटा चोरट्यांनी लावला आहे. शहरातील विविध भागांत सहा घरफोड्यांत चोरट्यांनी रोकड, सोने-चांदीचे दागिने असा 19 लाख 87 हजार रुपयांचा किमती ऐवज लंपास केला आहे. गेल्या काही दिवसांत घरफोड्यांत घट झाली होती. मात्र, पुन्हा एकदा चोरटे सक्रिय झाल्याचे दिसून येते आहे.

धनकवडी भागातील एका फ्लॅटचे लॉक तोडून चोरट्यांनी 4 लाख 33 हजारांचा मुद्देमाल चोरी केला. या प्रकरणी सिद्धार्थ मिलिंद पोतनीस (वय 46) यांनी सहकारनगर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. 10 जुलै रोजी रात्री साडेबाराच्या सुमारास पोतनीस यांच्या फ्लॅटचा कोयंडा चोरट्याने तोडून घरात प्रवेश केला. पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक खंडागळे करत आहेत.

मेढी पार्क औंध येथील सदनिकेतून चोरट्यांनी साडेतीन तोळे सोन्याचे दागिने आणि चांदीच्या वस्तू असा 1 लाख 90 हजारांचा ऐवज लांबवला. ही घटना 10 जुलै रोजी रात्री 11च्या सुमारास घडली. या प्रकरणी संध्या दिनेश खैर (वय 55, रा. चेंबूर) यांनी चतुश्रृंगी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

तिसर्‍या घटनेत मुंढवा भागातील पाल्म ग्रुव्हस सोसायटीतील बंद असलेल्या बंगल्यात झाडाच्या साहाय्याने चढून 5 लाख रुपये किमतीचे सोन्याचे दागिने चोरल्याची घटना घडली. याप्रकरणी मोहित संजय अग्रवाल (वय-25) यांनी मुंढवा पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. ही घटना 26 जूनदरम्यान घडली. सहायक पोलिस निरीक्षक जोर या प्रकरणाचा तपास करत आहेत.

चौथ्या घटनेत चोरट्याने देवघराच्या खिडकीचा गज कापून घरात प्रवेश करून 6 लाख 10 हजार किमतीचे 12 तोळे सोन्याचे दागिने आणि 3 लाख 10 हजार रोकड असा 9 लाख 20 हजारांचा मुद्देमाल लंपास केला. या प्रकरणी कल्पेश राम आढाव (वय-30) यांनी लोणीकाळभोर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. ही घटना 11 जुलै रोजी घडली. पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक धायगुडे करत आहेत.

कोंढवा बु. भागातील स्नेह अपार्टमेंटमधील तीन फ्लॅटचे लॉक तोडून चोरट्याने डल्ला मारला. या प्रकरणी रामेश्वर किशनराव सावरगावी यांनी कोंढवा पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. सावरगावी हे स्नेह अपार्टमेंट त्यांचा फ्लॅट बंद असताना चोरट्यांनी कोयंडा तोडून घरात प्रवेश करत 1 लाख 72 हजार किमतीचे 12 तोळे सोने चोरले. तर त्यांच्या बाजूच्या रियाज शेख यांच्या फ्लॅटचे लॉक तोडून 50 हजार किमतीचे दीड तोळे सोने लांबविले. चोरट्यांनी याच अपार्टमेंटमध्ये राहणार्‍या हर्षिता भोसले यांचा फ्लॅटचे लॉक तोडून 20 हजार किमतीचे 1 तोळे सोने पळविले. ही घटना 10 जुलै रोजी दुपारी 3 ते 4 च्या दरम्यान घडली.

दानपेटीवर चोरट्यांचा डल्ला

टिंगरेनगर येथील त्रिमूर्ती मंडळाच्या गणेश मंदिराची दान पेटी चोरून नेल्याची घटना घडली. या प्रकरणी भाऊसाहेब गुंडाप्पा हरताळे (वय 71) यांनी विश्रांतवाडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. या दान पेटीत अंदाजे 12 हजार असल्याचे सांगितले जात आहे. ही घटना 10 जुलै ते 11 जुलैदरम्यान घडली. पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक चव्हाण करत आहे.

परिमंडळ चार, पाचच्या हद्दीत सर्वाधिक घरफोड्या

विविध भागांत चोरट्यांनी सहा महिन्यांत तब्बल (11 जुलै अखेर) 300 घरफोड्या करून लाखोंचा ऐवज लंपास केला आहे. परिमंडळ चार आणि पाचच्या हद्दीत सर्वाधिक घरफोड्या झाल्याची नोंद आहे.

अशी घ्या खबरदारी

  • बाहेर जाताना घरात मौल्यवान वस्तू ठेवू नका.
  • बाहेरगावी जाताना शेजार्‍यांना माहिती द्या.
  • सोसायटीमधील अनेक व्यक्ती बाहेरगावी जाणार असतील, तर पोलिसांना त्याची कल्पना द्या.
  • चारित्र्य पडताळणी केलेल्या सुरक्षारक्षकाची नेमणूक करा.
  • सोसायटीमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसवा.
  • घरासमोर पेपर पडू देऊ नका. त्याद्वारे चोरट्यांना फ्लॅट बरेच दिवस बंद असल्याचे समजते.
  • घराबाहेर जाताना मुख्य दरवाजाची कडी व कुलूप लावू नये. त्याऐवजी लॅच लॉकचा वापर करावा.
  • बाहेर पर्यटनाला गेल्यानंतर शक्यतो तेथील फोटो सोशल मीडियावर टाकण्याचे टाळा.

हेही वाचा

काँग्रेस भाजपविरोधात तीव्र लढा उभारणार : नाना पटोले

राज्यातील २,२२७ ग्रा.पं. निवडणुका लवकरच

कोल्हापूर : कुत्र्यांच्या हल्ल्यात बालिकेचा कान तुटला

Back to top button