

मुंबई; पुढारी वृत्तसेवा : मौन सत्याग्रहाच्या माध्यमातून महात्मा गांधींनी ब्रिटिश सरकारला नामोहरण करून सोडले होते. आज त्याच अस्त्राचा वापर काँग्रेसने भाजप सरकारविरोधात केला आहे. भाजपच्या भ्रष्ट, अत्याचारी, हुकूमशाही सरकारविरोधात लढा सुरू आहे. आता हा लढा मुंबईसह महाराष्ट्रभर आणखी तीव्र करून भ्रष्ट भाजपचा राज्यभर भांडाफोड करून सळो की पळो करून सोडणार, असा इशारा काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी दिला.
मुंबई काँग्रेस आणि प्रदेश काँग्रेसच्या वतीने मंत्रालयाजवळ महात्मा गांधी यांच्या पुतळ्यासमोर मौन सत्याग्रह करण्यात आला. या आंदोलनात सहभागी नेते व कार्यकर्त्यांनी काळ्या मुखपट्ट्या बांधून भाजपचा निषेध केला. आंदोलनात प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, विधिमंडळ काँग्रेस पक्षनेते बाळासाहेब थोरात, विधान परिषदेतील गटनेते सतेज पाटील, मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षा आमदार वर्षा गायकवाड, प्रदेश कार्याध्यक्ष नसीम खान, माजी मंत्री नितीन राऊत आदी नेतेमंडळींसह शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते.
सरकारमध्ये सहभागी होण्याच्या अजित पवार यांच्या निर्णयावर बोलताना बाळासाहेब थोरात यांनी टीकास्त्र सोडले. राज्यातील सरकारमध्ये तिघे एकत्र आले हे खरे. परंतु, त्यात एक मुख्यमंत्री, दुसरा माजी मुख्यमंत्री, तर तिसरा मुख्यमंत्रिपदासाठी इच्छुक असणारा, असे तिघेजण आहेत. त्यामुळे या तिघांचा एकत्र मेळ बसणे अवघड आहे, असा टोला थोरात यांनी लगावला.