बेळगाव : टीव्ही सेंटर येथे 12 लाखांची घरफोडी | पुढारी

बेळगाव : टीव्ही सेंटर येथे 12 लाखांची घरफोडी

बेळगाव; पुढारी वृत्तसेवा :  बंद घर फोडून चोरट्यांनी 175 ग्रॅम सोन्याचे दागिने, तीन लाखांची रोख रक्कम व पाच मनगटी घड्याळांसह 12 लाख रुपयांचा ऐवज लांबवला. टीव्ही सेंटर येथे रविवारी (दि. 2) सायंकाळी सातच्या सुमारास हा प्रकार उघडकीस आला.

हजरत मुमताजपाशा कालेपिरजादे व त्यांचे कुटुंबीय टीव्ही सेंटरवरील चौथ्या क्रॉसवर राहतात. घरगुती कार्यक्रमासाठी शनिवारी (दि. 1) ते कुटुंबीयांसमवेत घर बंद करून कुडची (ता. रायबाग) गेले होते. या काळात चोरट्यांनी मुख्य दरवाजाचे इंटरलॉक तोडून आत प्रवेश केला. हजरत यांच्या बेडरूममधील कपाटाचे लॉकर तोडून त्यातील तीन लाखांची रोख रक्कम काढून घेतली. यानंतर बाजूलाच असलेल्या भावाच्या बेडरूममधील कपाटाचे लॉकर तोडले. तेथील तब्बल 175 ग्रॅम सोन्याचे दागिने काढून घेतले. यामध्ये सोनसाखळ्या, मंगळसूत्र, नेकलेस यांसह अन्य दागिन्यांचा समावेश आहे. याशिवाय कपाटातील पाच मनगटी घड्याळेही चोरट्यांनी घेतली. याची किंमत 30 हजार रुपये होते.

रविवारी सायंकाळी सातच्या सुमारास कालेपिरजादे कुटुंबीय बेळगावात परतले असता घराचा मुख्य दरवाजा तोडल्याचे दिसले. याशिवाय बेडरूममधील साहित्यही विस्कटलेले आढळून आले. त्यांनी ही माहिती एपीएमसी पोलिसांना दिली. पोलिस निरीक्षक मंजुनाथ हिरेमठ, उपनिरीक्षक मंजुनाथ बजंत्री व त्यांच्या सहकार्‍यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. नेमके काय चोरीला गेले आहे, याची माहिती घेऊन घटनेची नोंद सोमवारी पोलिसांत झाली. निरीक्षक हिरेमठ तपास करीत आहेत.

Back to top button