पुणे : सिंहगडावर मधमाश्यांच्या हल्ल्यात 8 जण जखमी | पुढारी

पुणे : सिंहगडावर मधमाश्यांच्या हल्ल्यात 8 जण जखमी

वेल्हे (पुणे ) : पुढारी वृत्तसेवा :  तरुणांच्या दगडफेकीमुळे आग्या मोहळाच्या मधमाश्यांनी रविवारी (दि. 18) सिंहगडावर पर्यटकांनी हल्ला केला. त्यात चार युवतींसह आठ जण गंभीर जखमी झाले, तर मधमाश्यांनी इतर वीस-पंचवीस पर्यटकांचा चावा घेतला.
टिळक बंगल्याजवळील तोफेच्या बुरुजावर दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास हा प्रकार घडला. ऐन गर्दीच्या वेळी मधमाशांनी हल्ला केल्याने पर्यटकांची धावपळ झाली. युवक – मुले मार्ग दिसेल तिकडे पळत सुटले. या घटनेमुळे पर्यटकांची सुरक्षा पुन्हा ऐरणीवर आली आहे. गडावरील खाद्यपदार्थ विक्रेते दत्ता चव्हाण, अजय खाटपे यांनी प्रसंगावधानता दाखवत मधमाश्यांना पिटाळून लावण्यासाठी धुराचे लोट केले, त्यामुळे मोठी दुर्घटना टळली.

घेरा सिंहगडचे माजी उपसरपंच अमोल पढेल म्हणाले, बुरुजाच्या खाली असलेल्या आतकरवाडीच्या कळकीच्या मेटालगतच्या कड्यावर आग्या मोहळाची आठ-दहा पोळी आहेत. बुरुजावर चढून दोन उन्मत्त तरुणांनी कड्यावरील आग्या मोहळाच्या पोळ्यांवर दगडफेक केली. त्यानंतर काही क्षणातच बुरुजाच्या परिसरापासून पुणे दरवाजापर्यंत मधमाशा पसरल्या.

सिंहगड वनविभागाचे वनरक्षक बाळासाहेब जिवडे म्हणाले, दोन गंभीर महिलांना त्यांच्या नातेवाइकांनी तातडीने उपचारासाठी दवाखान्यात नेले. तर इतर जखमींना सुरक्षारक्षकांनी वाहनतळापर्यंत आणून सोडले. मधमाश्यांचा धोका असलेल्या तोफेचा बुरुज व परिसरात तातडीने तीन सुरक्षारक्षक तैनात करण्यात आले.

दरम्यान, गडावरून खाली जाण्यासाठी पर्यटकांनी गर्दी केली. त्यामुळे पर्यटकांना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागला. सुट्टीमुळे सकाळपासूनच पुण्यासह देशभरातील सुमारे 15 हजार पर्यटकांनी गडावर गर्दी केली होती. त्यामुळे दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास गडावरील वाहनतळ हाऊसफुल्ल झाला. घाटरस्त्यावर दीड किलोमीटर अंतरापर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या. आतकरवाडी पायी मार्गाने येणार्‍या पर्यटकांची संख्याही दुपटीने वाढली होती.

हे ही वाचा : 

Mobile Addiction | धक्कादायक! मोबाईल हिसकावून घेतल्याने मुलीने रचला आईच्‍या हत्‍येचा कट

Ashadhi wari 2023 : टाळ, मृदुंग अन् हरिनामाने दुमदुमली गावे; नगर -सोलापूर मार्ग भगवेमय

Back to top button