Ashadhi wari 2023 : टाळ, मृदुंग अन् हरिनामाने दुमदुमली गावे; नगर -सोलापूर मार्ग भगवेमय | पुढारी

Ashadhi wari 2023 : टाळ, मृदुंग अन् हरिनामाने दुमदुमली गावे; नगर -सोलापूर मार्ग भगवेमय

वाळकी(अहमदनगर); पुढारी वृत्तसेवा : आषाढाची चाहुल लागली की, वारकर्‍यांना ओढ लागते, ती पांडूरंगाच्या दर्शनाची. कानाकोपर्‍यातून वारकरी, विठ्ठल भक्त संतांच्या दिंडीमध्ये सहभागी होत महिनाभराचा पायी प्रवास करत आषाढी एकादशी दिवशी पंढरपूरात दाखल होतात. नगर तालुक्यातील सोलापूर, दौंड महामार्गावरून शेकडो दिंड्यांचा प्रवास पंढरीच्या दिशेने होत आहे. दिंडीतून टाळ, मृदुंगाचा होणारा गजर अन् रामकृष्ण हरि, ज्ञानोबा माऊली तुकाराम,’च्या जयघोषाने महामार्ग दुमदुमला आहे.

आषाढी एकादशीनिमित्ताने विठ्ठल दर्शनाच्या ओढीने पांडूरंगाच्या मार्गक्रमण करत असलेल्या विविध संतांच्या शेकडो दिंड्या, पालखी सोहळा नगर – सोलापूर महामार्गावर रस्त्यावर पाहण्यास मिळत आहेत. आडमार्गानेही अनेक छोट्या मोठ्या दिंड्या पंढरपूरकडे मार्गस्थ होताना दिसत आहेत. सोलापूर महामार्गावरून मार्गक्रमण करणारी प्रमुख दिंडी म्हणून संतश्रेष्ठ निवृत्तीनाथ पालखी सोहळा ओळखली जाते. शिस्तबद्द म्हणून ओळखली जाणारी देवगडची दिंडीही याच मार्गावरून पंढरीकडे मार्गक्रमण करत आहे.

तालुक्यतील महामार्गावरील वाकोडी, दरेवाडी, वाळुंज, शिराढोण, दहिगाव, साकत, वाटेफळ, रुईछत्तीशी, आंबिलवाडी गावातून जाणार्‍या शेकडो दिंड्यामुळे वातावरण भक्तीमय बनले आहे. प्रत्येक गावातील ग्रामस्थांकडून पालखी सोहळ्याचे वाजत गाजत स्वागत केले जात आहे. दिंडीतील वारकर्‍यांचे मनोभावे आदरातिथ्य होत आहे. गावकर्‍यांकडून वारकर्‍यांसाठी प्रत्येक ठिकाणी शुद्ध पाण्याची व्यवस्था, भोजन, नाश्ता, चहा-पाण्याची खास व्यवस्था केली जात आहे. दिंडीच्या मुक्कामी ठिकाणी परिसर स्वच्छता, विजेची व्यवस्था करून वारकर्‍यांना कसल्याही बाबीची कमतरता जाणवू नये यासाठी ग्रामस्थ चोखपणे भूमिका पार पाडत आहेत.

जिल्हाधिकार्‍यांच्या आदेशानुसार तालुका पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक शिशीरकुमार देशमुख, उपविभागीय अधिकारी सुधीर पाटील, तहसीलदार संजय शिंदे, गटविकास अधिकारी श्रीकांत खरात आदीसह मंडलाधिकारी, तलाठी, ग्रामविकास अधिकारी, आरोग्य विभाग पालखी सोहळ्याचे स्वागत करण्यासोबत व्यवस्थेकडे बारकाईने लक्ष ठेवून आहेत.

कानी पडतोय टाळ मृदुंगाचा गजर

नगर – सोलापूर महामार्गावर वाहनांची मोठी वर्दळ असते. रात्रंदिवस वाहनांच्या कर्णकर्कश हॉर्नच्या आवाजाचा नागरिकांना त्रास सहन करावा लागतो. मात्र, सध्या या महामार्गावरून विठ्ठल दर्शनाच्या ओढीने पंढरीकडे मार्गक्रमण करणार्‍या शेकडो दिंडीतून होणारा हरिनामाचा जयघोष अन् टाळ मृदुंगाचा गजर नागरिकांच्या कानी पडत असल्याने भक्तीमय वातावरण बनले आहे.

टंचाई असतानाही पाण्याचे चोख नियोजन

पाऊस लांबल्याने महामार्गावरील गावांमध्ये पाणी टंचाईच्या झळा बसत आहेत. ग्रामस्थांना पाणी टंचाईला तोंड द्यावे लागत असले तरी शेकडो दिंडीतील वारकर्‍यांची तहान प्रत्येक गावातील ग्रामस्थांकडून भागविली जात आहे. वारकर्‍यांचे आदरातिथ्य, व्यवस्था करण्याचे काम ग्रामस्थांकडून चोखपणे पार पाडले जात आहे.

हेही वाचा

Bohada Festival : मोहाडीत बोहाडा उत्सवास प्रारंभ

Nashik : सहकार परिषद विकासाचे मॉडेल म्हणून परिचित होईल : ना. डॉ. भारती पवार

चार्‍याचं ठीक, पण..पाण्याचं काय? रणरणत्या उन्हात मेंढपाळांची भटकंती

Back to top button