Mobile Addiction | धक्कादायक! मोबाईल हिसकावून घेतल्याने मुलीने रचला आईच्‍या हत्‍येचा कट | पुढारी

Mobile Addiction | धक्कादायक! मोबाईल हिसकावून घेतल्याने मुलीने रचला आईच्‍या हत्‍येचा कट

पुढारी ऑनलाईन : मोबाईलचे इतके व्यसन असते की, तो मिळवण्यासाठी मुले कोणत्याही थराला जाऊ शकतात. असाच एक धक्कादायक प्रकार गुजरातच्या अहमदाबाद येथे समोर आलाय. मोबाईल हिसकावून घेणार्‍या आईला तिच्या १३ वर्षीय मुलीने मारण्याचा कट रचल्याचे निदर्शनास आले आहे. ‘अभयम १८१’ महिला हेल्पलाइनची मदत घेतल्यानंतर हा प्रकार उघड झाला. आईने मुलीकडून फोन हिसकावून घेतल्याने तिने हे कृत्य केले आहे. (Mobile Addiction)

द टाईम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार, पश्चिम अहमदाबाद येथे राहणाऱ्या ४५ वर्षीय महिलेला साखरेच्या डब्यात कीटकनाशक पावडर आणि बाथरूमच्या मजल्यावर फिनाइलसारखे द्रव वारंवार आढळून आले. यामुळे तिला धक्का बसला होता. अधिक माहिती घेतल्यानंतर असे निर्दशनास आले की १३ वर्षांच्या मुलीला तिच्या आईला मारण्याचा कट होता. अशा घटना सातत्याने घडत असल्याने तिला यावर उपाय शोधण्यासाठी हेल्पलाइन नंबर डायल करावा लागला.

“त्यानंतर चर्चेतून असे दिसून आले की, किशोरवयीन मुलीचा पालकाना दुखापत घडविण्याचा हेतू होता. आईने कीटकनाशके मिसळलेली साखर खावी अथवा निसरड्या जमिनीवर घसरून पडून तिच्या डोक्याला दुखापत व्हावी, यासाठी ती प्रयत्‍न करत होती. काही दिवसांपूर्वी आईने मुलीकडील फोन हिसकावून घेतला होता आणि तो परत देण्यास नकार दिला होता. तेव्हापासून ही मुलगी हिंसक झाली होती,” अशी माहिती अभयम १८१ महिला हेल्पलाइनच्या समुपदेशकाने दिली.

समुपदेशकाने पुढे म्हटले आहे की “पालकांनी आम्हाला सांगितले की, त्यांची मुलगी संपूर्ण रात्र फोनवर तिच्या मित्रांशी ऑनलाइन चॅटिंग करायची. सोशल मीडियावर रील अथवा पोस्ट पाहण्यात वेळ घालवत होती. यामुळे तिचे अभ्यासाकडे लक्ष नव्हते. यामुळे तिचे सामाजिक जीवन बिघडून गेले होते.”

समुपदेशकांनी सांगितले की, त्यांनी मुलीच्या पालनपोषणात कोणतीही कसर सोडली नाही; पण मुलीचे बदललेले वर्तन पाहून पालकाना अधिक धक्का बसला. हेल्पलाइनकडे आलेले हे एकच प्रकरण नाही, असे अभयम हेल्पलाइनच्या समन्वयक फाल्गुनी पटेल यांनी सांगितले.

“२०२० म्हणजे कोविड साथीच्यापूर्वी दिवसाला जेमतेम ३-४ कॉल येत असत. गेल्या काही वर्षात दिवसाला येणाऱ्या संख्येत तिपटीने वाढ झाली आहे. दरवर्षी आम्हाला असे सुमारे ५,४०० कॉल्स येतात. यात चिंताजनक बाब म्हणजे एकूण कॉल्सपैकी सुमारे २० टक्के कॉल्स हे १८ वर्षाखालील मुला-मुलींशी संबंधित आहेत,” असेही त्यांनी नमूद केले.

कोरोना काळात अभ्यासासाठी मुलांच्या हातात फोन आला. कोरोना साथीपूर्वी मुले पालकांच्या भीतीने सोशल मीडिया अथ‍वा इतर साइट्सवर जात नव्हते; पण आता किशोरवयीन मुले ऑनलाइन गेम्स आणि सोशल मीडियावर सक्रिय असल्याचे दिसून येते, असेही त्‍यांनी म्‍हटले आहे.

हेही वाचा :

Back to top button