नगर : 213 गुरुजींना आज पदोन्नतीचे गिफ्ट ; | पुढारी

नगर : 213 गुरुजींना आज पदोन्नतीचे गिफ्ट ;

नगर : पुढारी वृत्तसेवा : नव्या शैक्षणिक वर्षात तब्बल 213 गुरुजींना विस्तार अधिकारी व मुख्याध्यापक पदाचे गिफ्ट दिले जाणार आहे. आज सोमवारी सकाळी 11 वाजता मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर यांच्या मार्गदर्शनात शिक्षणाधिकारी भास्कर पाटील हे पारदर्शीपणे ही प्रक्रिया राबविणार आहेत. गेल्या वर्षभरापासून विस्तार अधिकार, केंद्र प्रमुख आणि मुख्याध्यापक पदाच्या पदोन्नत्या रखडलेल्या आहेत. यातील केंद्र प्रमुख पदोन्नतीला शासनाचा हिरवा कंदिल मिळालेला नव्हता. मात्र विस्तार अधिकारी व मुख्याध्यापक पदोन्नतीचा मार्ग मोकळा झाला होता. त्यामुळे या पदोन्नती नेमक्या कधी होणार, याकडे लक्ष लागले होते.

जिल्ह्यात 213 जागा रिक्त
जिल्ह्यात मुख्याध्यापक व विस्तार अधिकारीची 213 पदे रिक्त होती. या जागा पदोन्नतीने भरण्यासाठी शिक्षण विभागाने तसा कार्यक्रम तयार केला आहे.

कोणत्या, किती जागा भरणार!
मुख्याध्यापक 171, उर्दू मुख्याध्यापक 6 जागा आहेत. पदवीधर शिक्षक, प्राथमिक शिक्षक तसेच ज्येष्ठता व अन्य अटी पूर्तता करणार्‍या शिक्षकांना मुख्याध्यापकाची पदोन्नती दिली जाणार आहे. तर पदवीधर शिक्षक, केंद्र प्रमुख, मुख्याध्यापक यांच्यामधून पात्र शिक्षकाला विस्तार अधिकारी पदोन्नती दिली जाईल. विस्तार अधिकारी श्रेणी 2 -12, श्रेणी 3- 24, अशा साधारणतः 36 जागा रिक्त आहेत.

समुपदेशनाने प्रक्रिया राबविणार
संबंधित रिक्त पदे भरण्यासाठी पात्र, अपात्र कर्मचार्‍यांची संवर्गनिहाय यादी, समुपदेशन पट, रिक्त पदाची यादी कायमस्वरुपी अथवा तात्पुरता नकारपत्र यापूर्वीच शिक्षणाधिकार्‍यांनी मागाविले होते. त्यामुळे आज सोमवारी सकाळी 11 वाजता येरेकर यांच्या मार्गदर्शनात शिक्षणाधिकारी पाटील हे संबंधित पदोन्नतीची प्रक्रिया राबविणार आहेत. ज्येष्ठतेनुसार गुरुजींना मिळणार संधी
समुपदेशन प्रक्रियेत ज्येष्ठेतेनुसार पात्र कर्मचार्‍यांनी पदस्थापनेचे ठिकाण मागणी केल्यानंतर संबंधित कर्मचारी यांची विकल्पाची नोंद समुपदेशन प्रक्रिया पदस्थापना पप्रत्रावर घेवून संबंधितांची स्वाक्षरी घेतली जाणार आहे. समुपदेशन प्रक्रियेसाठी तालुकास्तरावरील कार्यालयामध्ये पात्र कर्मचार्‍यांनी उपस्थित राहण्याचेही कळविण्यात आलेले आहे.

रिक्त होणार्‍या जागांचे काय करणार ?

आज होणारी पदोन्नतीची प्रक्रिया ही 31 मे 2023 रोजी रिक्त असलेल्या जागांवर होणार आहे. त्यामुळे हे शिक्षक पदोन्नतीने गेल्यानंतर त्यांच्या रिक्त होणार्‍या जागांचे काय करणार, तसेच 30 जुनअखेरही अनेक मुख्याध्यापक व विस्तार अधिकारी सेवानिवृत्त होणार आहेत. मात्र आजची पदोन्नती ही 31 मे अखेरच्या रिक्त जागांवर केली जाणार आहे. त्यामुळे जुनच्या रिक्त जागा कशा भरणार, असाही प्रश्न आहेच. तर दुसरीकडे 31 मे रोजी जुनमध्ये सेवानिवृत्त होणार्‍या शाळा रिक्त दिसत नव्हत्या. त्यामुळे त्या पदोन्नत्या करणे शक्य नव्हते. परिणामी, जुननंतर ‘अशा’ रिक्त शाळांवर टप्प्याटप्याने मुख्याध्यापक नियुक्ती दिले जाईल, असे प्रशासन सांगत आहे.

हे ही वाचा : 

नाशिक : बोअरवेलही आटले, जलवाहिनीअभावी रहिवासी तहानलेले

नगर : पारनेर तहसीलमध्ये होणार प्रांताधिकारी दालन ; खासदार डॉ. सुजय विखे

Back to top button