

पारनेर (नगर ) : पुढारी वृत्तसेवा : महसूल विभागाचा कारभार महसूलमंत्री राधाकृष्ण विखे यांनी हाती घेतल्यानंतर अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले. नायब तहसीलदारांसह अन्य अधिकार्यांना मोठ्या संख्येने बढती देण्यात आली. मंडळे वाढविण्यात आली. त्यामुळे कामांचा निपटारा लवकर होत आहे. यापुढे श्रीगोंदा व पारनेर येथे स्वतंत्र प्रांत असून, पारनेर शहरातील तहसील कार्यालयातच प्रांतधिकारी यांचे दालन करण्यात येणार आहे, असे खासदार डॉ. सुजय विखे यांनी सांगितले.
शिवरस्ता, सात बारा दुरूस्ती, कर्मचारांची अपुरी संख्या यासह अन्य कामांबाबत खासदार विखे यांनी पारनेर तहसील कार्यालयात विविध महसूलच्या कामकाजाचा आढावा घेताला. उपस्थित नागरिकांनी आपले प्रश्न खासदार विखेंकडे मांडले. यावेळी जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सुजीत झावरे, विश्वनाथ कोरडे, राहुल शिंदे, गणेश शेळके, वसंत चेडे, डॉ. भाऊसाहेब खिलारी, बाळासाहेब रेपाळे, युवराज पठारे, किरण कोकाटे, नायब तहसीलदार जी. आर. आढारी, ए. बी. रणदिवे व ग्रामस्थ उपस्थित होते.
खासदार विखे यांनी तहसील कार्यालयात विभागनिहाय आढावा घेतला. रेशन कार्ड धान्य वाटप, विभक्त रेशनकार्ड, संजय गांधी निराधार योजना, शासन आपल्या दारी, तसेच भूमि अभिलेख विभागात दैनंदिन कामकाज करताना येणार्या अडचणी जाणून घेऊन नागरिकांच्या समस्या सोडवण्याच्या दृष्टीने संबंधित अधिकार्यांना सूचना दिल्या. तहसील कार्यालयातील अपुरी कर्मचारी संख्या, तहसीलदारांचे वाहन या अडचणी महिन्यात मार्गी लावण्याचे आश्वासन त्यांनी दिले.
पुरवठा निरीक्षकांना निलंबित करा
धान्य पुरवठा निरीक्षक विठ्ठल काकडे यांचा तहसीलमध्ये गलथान कारभार सुरू आहे. तालुक्यात घेण्यात आलेल्या शिबिरात ते गैरहजर होते. सर्वसामान्यांची कामे त्यांच्याकडून होत नाहीत. कारभारात अनियमिता असल्याने त्यांना निलंबित करावे, अशी मागणी राहुल शिंदे यांनी खासदार विखेंकडे केली.
सर्वच विभागांत प्रभारी अधिकारी
पारनेर तालुक्यामध्ये सर्वच विभागांत प्रभारी अधिकारी काम करीत आहेत. तालुक्याच्या लोकप्रतिनिधींच्या दबावामुळे पारनेर तालुक्यात कोणीही जबाबदार अधिकारी यायला तयार नाहीत, अशी खंत खासदार डॉ.विखे यांनी यावेळी व्यक्त केली.
भूमिअभिलेखचा कारभार वेगवान
भूमिअभिलेख कार्यालयात अपुरे कर्मचारी होते. आता कर्मचारी संख्या वाढली असून, खासगी एजन्सीही दिली आहे. मोजणीचे दहा हजार रूपये शासन भरत आहेत. 1270 प्रलंबित प्रकरणांपैकी 470 मार्गी लागल्याची माहिती शिरसतेदार दिनेश पुसदकर यांनी दिली.
हे ही वाचा :