पिंपरी : महापालिका शाळांची गुणवत्ता वाढवा ; आयुक्त शेखर सिंह यांचा शिक्षकांना कानमंत्र | पुढारी

पिंपरी : महापालिका शाळांची गुणवत्ता वाढवा ; आयुक्त शेखर सिंह यांचा शिक्षकांना कानमंत्र

पिंपरी : पुढारी वृत्तसेवा : पिंपरी-चिंचवड महापालिका शाळांचा दर्जा व गुणवत्ता वाढविण्यासाठी शिक्षकांनी झोकून देऊन काम केले पाहिजे. विद्यार्थी केंद्रबिंदू समजून शिक्षण द्यावे. शिक्षकांच्या अशा कामामुळे पालिका शाळांमध्ये प्रवेश घेण्यासाठी रांगा लागतील, असा विश्वास महापालिकेचे आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांनी व्यक्त केला. महापालिकेच्या प्राथमिक व माध्यमिक शाळांतील मुख्याध्यापक व शिक्षकांसाठी संवाद कार्यशाळा गुरुवारी (दि.8) चिंचवड येथील प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृहात झाली. या वेळी आयुक्त सिंह बोलत होते. कार्यक्रमात दहावी परीक्षेत 90 टक्क्यांपेक्षा अधिक गुणांनी उत्तीर्ण झालेल्या 13 विद्यार्थ्यांचा प्रत्येकी 1 लाख रुपयांचा धनादेश देऊन सन्मान करण्यात आला. शैक्षणिक दिनदर्शिका 2023-24, बालवाडी अभ्यासक्रम हस्तपुस्तिका व बालवाडी उपक्रम दिनदर्शिकेचे प्रकाशन करण्यात आले. व्यासपीठावर अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे, सहाय्यक आयुक्त विजयकुमार थोरात, सहाय्यक प्रशासन अधिकारी रजिया खान, रोहिणी शिंदे यांच्यासह मुख्याध्यापक व शिक्षक उपस्थित होते.

आयुक्त सिंह म्हणाले की, विद्यार्थ्यांना बदलत्या जगाची ओळख करून देण्यासाठी व त्यांच्या स्वप्नांना प्रेरणा देण्यासाठी शिक्षकांनी प्रयत्नशील राहिले पाहिजे. आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून विद्यार्थ्यांना आधुनिक जगाची ओळख करून देण्याबरोबरच अभ्यासक्रमासोबत विद्यार्थ्यांचे संवाद कौशल्य, व्यक्तिमत्त्व विकास यावरही शिक्षकांनी भर दिला पाहिजे. क्वालिटी कौन्सिल ऑफ इंडियातर्फे शिक्षकांना प्रशिक्षण दिले जात आहे. त्याचा निश्चितपणे फायदा होणार आहे. समस्यांचे निराकरण करण्यासाठी सारथी हेल्पलाइनवर शालेय सुविधांसंदर्भात तक्रारवजा सूचना शिक्षकांनी कराव्यात. या तक्रारींचा तातडीने निपटारा केला जाईल.
अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे म्हणाले की, विद्यार्थ्यांच्या संपूर्ण आरोग्य तपासणीसाठी क्षेत्रीय कार्यालयनिहाय पथके नेमली आहेत. शिक्षकांचे प्रश्न तत्परतेने सोडविण्यासाठी प्रशासन काम करीत आहे. शिक्षकांनी शाळेची गुणवत्ता वाढविण्यासाठी प्रयत्नशील राहावे. सहाय्यक आयुक्त विजयकुमार थोरात यांनी प्रास्ताविक केले. गणेश लिंगडे यांनी सूत्रसंचालन केले. रामेश्वर पवार यांनी आभार मानले.

Back to top button