‘ती’च्या हाती आता एसटीचे स्टेअरिंग; पुण्यात प्रथमच 6 जणींची नियुक्ती | पुढारी

‘ती’च्या हाती आता एसटीचे स्टेअरिंग; पुण्यात प्रथमच 6 जणींची नियुक्ती

पुणे; पुढारी वृत्तसेवा : वर्षभराचे प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर आता महिला चालकांनी एसटीचे स्टेअरिंग हाती घेतले आहे. पुणे विभागातील सासवड डेपोत तीन जणींनी आणि शिरूर डेपोमध्ये तिघींनी गुरुवारी (दि.8) चालक पद स्वीकारले आणि प्रवासी वाहतुकीची पहिली फेरी पूर्ण केली. एसटीच्या पुणे विभागातील सासवड डेपोमध्ये नियुक्ती झालेल्या अर्चना अत्राम यांनी पहिली प्रवासी वाहतूक सासवड, राख, गुळुंचे, निरा दरम्यान करीत महिला आता कोणत्याही क्षेत्रात मागे नसल्याचे पुन्हा एकदा दाखवून दिले. एसटी महामंडळामध्ये चालक पदावर रुजू झालेल्या या पहिल्याच महिला असून, आता येथून पुढे एसटी महामंडळाच्या चालकपदासाठी महिलांना दरवाजे उघडे झाले आहेत.

अत्राम यांचा व्हिडिओ व्हायरल…

एसटी महामंडळ प्रशासनाने अर्चना अत्राम यांची नियुक्ती सासवड डेपो येथे बुधवारी (दि. 7) केली. त्यांनी येथे बुधवारीच चालक पदाचा पदभार घेतला आणि दुसर्‍या दिवशी गुरुवारी त्यांनी पहिली महिला चालकाची प्रवासी वाहतूक फेरी करण्याचा मान मिळवला. त्यांनी सासवड ते निरादरम्यान प्रवाशांना घेऊन एसटी बस चालवली. त्यांचा बस चालवतानाचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. त्यांचे सर्व स्तरामधून कौतुक होत असून, पहिली प्रवासी फेरी सोडल्यानंतर स्थानिकांनी त्यांचा सन्मान केला.

आणखी 17 महिलांची लवकरच नियुक्ती…

एसटी महामंडळाने दीड ते दोन वर्षांपूर्वी महिला चालकांची भरती केली होती. यात सुमारे 30 ते 40 महिला चालकांची भरती करण्याचे नियोजन होते. त्यातील आणखी 17 महिला चालक या लवकरच पुणे विभागात रुजू होणार आहेत. त्यांचे प्रशिक्षण पूर्ण झाले आहे.

पुणे विभागात बुधवारपासून 6 महिला चालक रुजू झाल्या आहेत. यातील 3 सासवड आणि 3 शिरूर डेपोमध्ये रुजू झाल्या. सुरुवातीला आम्ही त्यांना नवीन असल्यामुळे ग्रामीण भागातील मार्ग प्रवासी वाहतुकीसाठी दिले आहेत. सध्या त्यांना लांबपल्ल्याची ड्युटी दिली जाणार नसून, रात्रपाळीदेखील दिली जाणार नाही. लवकरच आणखी 17 महिला चालक पुणे विभागात रुजू होतील.

– सचिन शिंदे, विभागीय वाहतूक अधिकारी, एसटी, पुणे विभाग

हेही वाचा

वाल्हे पालखीतळावरील सोयी-सुविधांकडे शासनाचे दुर्लक्ष

गेमिंगद्वारे मुलांचे धर्मांतरण प्रकरणाची चौकशी करा

कोल्हापूर : डिजिटल व्यवहारास ब्रेक कोट्यवधीची उलाढाल ठप्प

Back to top button