कोल्हापूर : डिजिटल व्यवहारास ब्रेक कोट्यवधीची उलाढाल ठप्प | पुढारी

कोल्हापूर : डिजिटल व्यवहारास ब्रेक कोट्यवधीची उलाढाल ठप्प

कोल्हापूर, पुढारी वृत्तसेवा : वादग्रस्त स्टेटसवरून कोल्हापुरात बुधवारी झालेल्या दंगलीमुळे जिल्ह्यातील इंटरनेट सेवा 31 तास बंद ठेवण्यात आली. या निर्णयामुळे डिजिटल व्यवहारास ब्रेक लागला. यामुळे आयटीसह ऑनलाईन व्यवहारांतून होणारी कोट्यवधी रुपयांची उलाढाल ठप्प झाली. सामाजिक शांततेसाठी हा निर्णय असला, तरी केवळ इंटरनेटची सोशल मीडिया साईट बंद केली असती, तर उलाढाल सुरू राहिली असती, असे मत या क्षेत्रातील तज्ज्ञांनी व्यक्त केले.

गुगलसह विविध मनी अ‍ॅपमार्फत मोठ्या प्रमाणात आर्थिक व्यवहार होतात. पर्यटकही रोख पैशाऐवजी ऑनलाईन पेमेंटवर भर देतात. त्यामुळे रोखीऐवजी मोबाईलवरून इंटरनेटद्वारे ऑनलाईन मनी ट्रान्स्फर मोठ्या प्रमाणात करण्यात येते. त्यामुळे डिजिटल व्यवहार मोठ्या प्रमाणात होतात. कोल्हापुरातही मोठ्या प्रमाणात ऑनलाईन खरेदी केली जाते. तसेच विविध कारणांसाठी मोबाईलवरून पैसे भागविले जातात. अगदी चहाच्या बिलापासून कपडे वस्तू खरेदीपर्यंत अनेक ठिकाणी ऑनलाईन पेमेंट केले जाते.

बुधवारी शहरात झालेल्या दंगलीमुळे जिल्हा प्रशासनाने जिल्ह्यातील इंटरनेट सेवा बंद केली. इंटरनेट सेवा बंद झाल्याने गुरुवारी दिवसभर ऑनलाईन व्यवहार ठप्प झाले. खिशात रोख पैसे नसल्याने अनेकांची गोची झाली. त्यामुळे मोबाईलवरून पैशाची देवाणघेवाण होत नसल्याने क्रेडिट, डेबिट कार्ड स्वॅपिंगसाठी नागरिकांची धांदल उडाली.

आयटी क्षेत्रालाही मोठा फटका बसला. पुण्या-मुंबईतील अनेक कंपन्यांसाठी कोल्हापुरातून 15 हजारांवर युवक-युवतींचे ‘वर्क फ्रॉम होम’ सुरू आहे. हे काम ठप्प झाले. स्थानिक कंपन्यांत सुमारे 5 हजारांवर कर्मचारी कार्यरत आहेत. त्यांच्या सेवेवरही परिणाम झाला. आयटी क्षेत्राचे 20 ते 25 कोटी रुपयांचे नुकसान झाल्याचे या क्षेत्रातील तज्ज्ञांनी सांगितले.

शेअर मार्केटमधील व्यवहारालाही फटका बसला. प्रत्यक्ष शेअर बाजारावर परिणाम झाला नसला, तरी स्थानिक शेअर ब—ोकर यांचे कार्यालयीन कामकाज ठप्प झाल्याने व्यवहारांवर मर्यादा आल्या.

बँकांचे व्यवहार सुरळीत

इंटरनेट सेवा बंद असली, तरी बँकांना यातून वगळण्यात आले होते. त्यामुळे राष्ट्रीयीकृत आणि नागरी बँकांतून आरटीजीएस आणि अन्य सेवा दिवसभर सुरळीत सुरू होत्या. बँकिंग सेवा सुरळीत असल्याने नागरिकांची फारशी गैरसोय झाली नसल्याने बँकिंग क्षेत्रातून सांगण्यात आले.

ब्राँडबँड सेवा सुरू हवी होती

दंगलीमुळे इंटरनेट सेवा बंद केली; मात्र संपूर्ण सेवा बंद करण्याऐवजी केवळ सोशल मीडिया साईट बंद करुन बँकिंगप्रमाणे आयटीला ब्राँडबँड सेवा सुरू ठेवली असती, तर आयटी क्षेत्राचे नुकसान टळले असते, असे आयटी असोसिएशनचे अध्यक्ष प्रताप पाटील यांनी सांगितले.

एटीएम केंद्रांवर नागरिकांची गर्दी

इंटरनेटच बंद राहिल्याने ऑनलाईन देवाणघेवाणीच्या सर्व सुविधा दिवसभर बंद होत्या. यामुळे सकाळपासून एटीएम केंद्रांवर तसेच बँकांत पैसे काढण्यासाठी तसेच भरण्यासाठी नागरिकांची मोठी गर्दी होती. काही केंद्रांवर तर नागरिकांच्या रांगा लागल्याचे चित्र होते. ऑनलाईनद्वारे घरबसल्या बँक खात्यावरील रक्कम काढणे, भरणे, दुसर्‍या खात्यावर तसेच अन्य ग्राहकांच्या खात्यावर जमा करणे या सर्व बाबी करता येतात. यामुळे ऑनलाईन व्यवहार दिवसेंदिवस वाढत चालले आहेत. बहुतांश ग्राहकांचा याकडेच ओढा आहे. अशा सर्वांना आज इंटरनेट बंदचा मोठा फटका बसला. सर्व व्यवहार बँकेत जाऊन करावे लागले. पैसे काढणे आणि भरण्यासाठी बँकेत तसेच एटीएम केंद्रांवर जावे लागले. अनेक ग्राहकांना एटीएममधून पैसे काढण्यावरही मर्यादा येत होती.

ऑनलाईन पार्सल सुविधा ठप्प

इंटरनेट बंदमुळे जिल्ह्यातील पार्सल सुविधा गुरुवारी दिवसभर ठप्प राहिली. याचा मोठा फटका व्यावसायिकांनाही बसला. ऑनलाईन खरेदी तसेच खाद्यपदार्थांची देवाणघेवाण आज बंद राहिली. जिल्ह्यात दिवसभरात सुमारे 40 ते 50 हजार पार्सलचे वितरण होते. याकरिता वितरण करणार्‍यांना संबंधितांच्या जागेवर जाऊन ऑनलाईन स्कॅनिंग करणे आवश्यक असते. गुरुवारी इंटरनेट बंद असल्याने पार्सल वितरण बंद राहिले. शहरात ऑनलाईन खाद्य पदार्थ मागवण्याचेही प्रमाण दिवसेंदिवस वाढत चालले आहे. दररोज शहरात सकाळी सात ते रात्री अकरा वाजेपर्यंत ही सेवा उपलब्ध असते. शहरात दररोज सुमारे पाच हजारांवर खाद्य पदार्थांच्या पार्सलचे वितरण होत असते. मात्र, इंटरनेट सेवा बंद असल्याने नागरिकांना खाद्य पदार्थांची ऑर्डरच देता आली नाही.

Back to top button