वाल्हे पालखीतळावरील सोयी-सुविधांकडे शासनाचे दुर्लक्ष | पुढारी

वाल्हे पालखीतळावरील सोयी-सुविधांकडे शासनाचे दुर्लक्ष

वाल्हे(पुणे); पुढारी वृत्तसेवा : श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्याचा जिल्ह्यातील शेवटचा मुक्काम असलेल्या, वाल्हे (ता. पुरंदर) येथे शासकीय मालकीचा भव्य पालखीतळ आहे. मात्र, या पालखीतळावर सुविधा पुरवण्याकडे सरकारचे दुर्लक्ष होत आहे.
मागील सहा-सात वर्षांपासून, पालखीतळ सुशोभीकरणातून, भव्य पालखी मैदानास सीमाभिंत, दोन स्वागत कमानी, हायमास्ट दिवे, पालखी विसावा, ओटा आदी कामे शासनाच्या माध्यमातून केली होती.

मात्र, दोन स्वागत कमानी बांधल्या असतानाच, रेल्वे प्रशासनाकडून भुयारीमार्गाचे काम केले गेले. भुयारी मार्गामुळे पालखीतळात प्रवेश करताना उभारलेल्या दोन स्वागत कमानींपैकी, एका स्वागत कमानीचा वापरच होत नाही. यासाठी पालखीतळावर दुस-या बाजूने पर्यायी रस्ता व्हावा, अशी मागणी मागील वर्षी केली होती. त्या अनुषंगानेच पालखीतळावर दुस-या बाजूने, मागील वर्षीच रस्ता तयार करून दिला आहे. मात्र, या रस्त्यावर अद्याप स्वागत कमान उभारलेली नाही.

भव्य पालखी मैदान परिसरात विविध संस्था, तसेच ‘हरितवारी’ उपक्रमांतर्गत आळंदी देवस्थान, अभिनेते सयाजी शिंदे यांची देवराई संस्था, बाणेर येथील वसुंधरा अभियान, प्रा. डॉ. दिगंबर दुर्गाडे मित्रपरिवार, वाल्हे ग्रामपंचायत, सुकलवाडी ग्रामपंचायत, वृक्षसंवर्धन ग्रुप वाल्हे, विविध पक्षांतील नेते, उद्योजक राहुल यादव युवा मंच, स्थानिक युवक, यांच्या वतीने येथील पालखी मैदानात जवळपास 400 -450 विविध प्रकारची झाडे लावली आहेत. झाडांना पाण्यासाठी पालखी मैदानावर कोणतीही सोय नाही. मागील काही वर्षांपासून, श्रीमंत दगडूशेठ हलवाई ट्रस्टच्या माध्यमातून, उपलब्ध केलेल्या टँकर व ग्रामपंचायतीच्या माध्यमातून झाडे जगविण्याचा प्रयत्न चालू आहे.

मैदानावर कायमस्वरूपी पाण्याची योजना राबवण्याची मागणी अनेक वर्षांपासून होत असून, शासनाचे याकडे दुर्लक्ष आहे.
जिल्हाधिकारी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, पोलिस व तालुका प्रशासन आदींनी नुकतीच पालखीतळाची पाहणी करून प्रशासनाला सूचना केल्या होत्या. पालखीतळापासून सुकलवाडी- झिरपवस्ती, गुळूंचे मार्गे निरा येथील रस्ता तसेच पालखीतळापासून, सुकलवाडी, मुकदमवाडी, अंबाजीचीवाडी, गायकवाडवाडी मार्गे राख येथे जाणा-या मार्गाचे काम तातडीने पूर्ण करण्याच्या सूचना होत्या. मात्र, वाल्हे मुक्कामी श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा येण्यास आठ दिवस राहिलेले असतानाही अद्याप या रस्याचे काम सुरू झालेले नाही.

चार वर्षांपूर्वी बांधलेल्या ओट्याचे दगड कोसळले

दीड- दोन महिन्यांपासून आळंदी देवस्थान, विविध प्रशासकीय अधिकारी आदींनी वाल्हे पालखीतळासह सर्वच मुक्काम, विसावा ठिकाणी भेट देऊन पाहणी केली. मात्र, वाल्हे पालखीतळावरील चार-पाच वर्षांपूर्वी बांधलेल्या ओट्याच्या दोन बाजूंचे कोपर्‍याचे दगड निसटले आहेत. सोहळा आठ दिवसांवर येऊन ठेपला तरी अद्याप प्रशासनाचे याकडे लक्ष गेले नाही. ओट्याच्या बाजूने काटेरी झुडपे उगवली असून, अद्याप यासंदर्भातही दखल घेतली नाही.

हेही वाचा

Election 2024 : तीन राज्यांच्या विधानसभांसोबतच लोकसभा निवडणुका होण्याची चर्चा

सांगवी : जलसंपदा विभागाच्या अधिकार्‍यांचा वरदहस्त; शेतकर्‍यांचा विभागावर गंभीर आरोप

लोणी-धामणी : गुप्त धनाच्या आशेने शेतात खोदकाम; अंधश्रद्धेला बळी पडून तिसऱ्यांदा प्रयत्न

Back to top button