बोटा : दारूच्या नशेत मित्रावरच केला चाकूने हल्ला | पुढारी

बोटा : दारूच्या नशेत मित्रावरच केला चाकूने हल्ला

बोटा(अहमदनगर); पुढारी वृत्तसेवा : जीवाला- जीव देणार्‍या मित्राने घात करीत दारूच्या नशेत बाचाबाची झाल्याने मित्रावर चाकूने हल्ला करीत जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याची घटना संगमनेर तालुक्यातील कौठे बुद्रुक येथे घडली. याबाबत माहिती अशी की, कौठे बुद्रुक येथील जिवलग मित्र असलेले गोरक्ष विठ्ठल वाकळे व रॉकी भाऊसाहेब जाधव या दोघांमध्ये शुक्रवारी सायंकाळी दारूच्या नशेत भांडण झाले होते. मात्र, शनिवारी पुन्हा रात्री 8 वाजण्याच्या सुमारास दोघांनी एकत्र गावातील दारूच्या ठेक्यावरून दारू विकत घेतली.

दोघांनी सोबतच चायनिज हॉटेलमध्ये एकत्र दारूची पार्टी केली. पार्टी करून घरी परतत असताना खंडोबा मंदिराजवळील पुलावर आले असताना दोघांमध्ये पुन्हा पैशावरून दारूच्या नशेत वाद सुरू झाले. या वादातून राग अनावर न झाल्याने रॉकी भाऊसाहेब जाधव याने गोरक्ष विठ्ठल वाकळे यांच्यावर जवळ असलेल्या चाकूने सपासप वार करत खुनी हल्ला केला. यात वाकळे हे गंभीर जखमी झाले. वाकळे रक्तबंबाळ झाल्याचे बघून जाधव याने घटना स्थळावरून पळ काढळा.

यादरम्यान या ठिकाणावरून येणार्‍या जाणार्‍या नागरिकांच्या सदर बाब लक्षात आल्याने त्यांनी घारगाव पोलिसांना खबर दिली. जखमी वाकळे यांना खासगी रुग्णवाहिकेतून उपचारासाठी संगमनेर येथे हलविण्यात आले. परंतु प्रकृती नाजूक असल्याने प्राथमिक उपचार करत नाशिक येथे हलविण्यात आले असल्याची माहिती समोर आली आहे.

दरम्यान, घारगाव पोलिसांनी घटना स्थळाची पाहणी करीत आरोपीचा शोध घेतला असता, रॉकी जाधव याला मुळानदी काठावरून चाकूसह अटक केली आहे. या दोघांमध्ये नेमका कशावरून वाद झाला. हा गुन्हा घडला कसा, याचा तपास घारगाव पोलिस करीत असल्याचे सांगण्यात आले.

हेही वाचा

श्री संत गजानन महाराज पालखीचे मराठवाड्यात आगमन; पानकनेर येथे स्वागत

लोणी : खंडकरी शेतकर्‍यांच्या जमिनीबाबत निर्णय घेणार : महसूलमंत्री विखे पाटील

रायगड : आ. गोगावले यांचे शिवसृष्टीचे स्वप्न होणार साकार

Back to top button