रायगड : आ. गोगावले यांचे शिवसृष्टीचे स्वप्न होणार साकार | पुढारी

रायगड : आ. गोगावले यांचे शिवसृष्टीचे स्वप्न होणार साकार

नाते; इलियास ढोकले :  हिंदवी स्वराज्याची राजधानी किल्ले रायगडच्या पायथ्याशी शिवसृष्टीची तमाम शिवभक्तांची मागणी आमदार भरत गोगावले यांच्या माध्यमातून पाहिलेले स्वप्न अखेर पूर्णत्वास जाण्याचे स्पष्ट संकेत किल्ले रायगडावर दोन जून रोजी झालेल्या राज्याभिषेक सोहळ्याप्रसंगी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलेल्या घोषणेने पूर्णत्वास जाणार असून तमाम शिवभक्तांकडून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व आमदार भरत गोगावले यांना धन्यवाद देण्यात येत आहेत.

किल्ले रायगडावर अनेक शिवभक्तांना जाण्याची इच्छा असताना देखील काही वर्षापर्यंत रोपवेची सुविधा सुरू होण्यापूर्वीपर्यंत जाण्यास असलेल्या अनेक अडचणी लक्षात घेऊन छत्रपती शिवरायांच्या पन्नास वर्षाच्या कारकिर्दीतील महत्त्वाचे टप्पे किल्ले रायगडाच्या पायथ्याशीच महाड अथवा पाचाड परिसरामध्ये निर्माण करण्यासंदर्भात शिवसृष्टीची कल्पना आ. भरत गोगावले यांनी गेल्या काही वर्षापासून राज्य शासनासमोर सातत्याने मांडली होती. या संदर्भात अनेक वेळा घोषणा होण्याची शक्यता वर्तविण्यात आली होती, मात्र काही कारणास्तव या योजनांच्या घोषणेची मूर्त स्वरूप प्राप्त झाले नव्हते.

२ जून ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशी रोजी किल्ले रायगडावर झालेल्या हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांच्या तिथीनुसार राज्याभिषेक सोहळ्याप्रसंगी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आमदार गोगावले यांची असलेली मागणी व त्याला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेली साथ लक्षात घेऊन या शिवसृष्टीला मान्यता देऊन या कामी पन्नास कोटी रुपयांची प्राथमिक तरतूद करण्याचे देखील जाहीर केल्याने गेल्या अनेक वर्षापासून शिवभक्तांनी पाहिलेले आ. गोगावले यांच्या माध्यमातून स्वप्न पूर्णत्वास जाणार आहे.
यामध्ये राज्य व देशातील ऐतिहासिक पद्धतीने काम करणाऱ्या संस्था व मान्यवरांचे मार्गदर्शन घेतले जाईल तसेच या संदर्भात राज्यांमध्ये अनेक ठिकाणी निर्माण करण्यात आलेल्या शिवसृष्टीची प्रत्यक्ष भेट देऊन तेथील केलेल्या वास्तूंची माहिती घेऊन ही शिवसृष्टी निर्माण केली जाईल, असा विश्वास आमदार गोगावले यांनी बोलून दाखविला.

  • किल्ले रायगडच्या पायथ्याशी असणाऱ्या सुमारे ४५ एकर जागेमध्ये ही शिवसृष्टी निर्माण करण्याबाबत आगामी काळात आता प्रशासकीय पातळीवर कार्यवाही सुरू होईल अशी माहिती आमदार गोगावले यांनी प्रस्तुत प्रतिनिधीशी बोलताना दिली आहे.

Back to top button