पिंपरी-चिंचवड पालिकेच्या मिळकतकरात पडणार 45 कोटींची भर | पुढारी

पिंपरी-चिंचवड पालिकेच्या मिळकतकरात पडणार 45 कोटींची भर

पिंपरी(पुणे); पुढारी वृत्तसेवा : पिंपरी-चिंचवड शहरात राहण्यास पसंती दिली जात असल्याने शहरात झपाट्याने लोकवस्ती वाढत आहे. शहरात 31 मे रोजीपर्यंत महापालिकेच्या करसंकलन विभागाकडे मिळकती नोंदणीचा आकडा 6 लाख 2 हजार 203 पर्यंत पोहोचला आहे. गेल्या वर्षभरात शहरात 25 हजार 637 नव्या मिळकतींची भर पडल्याने पालिकेच्या तिजोरीत दरवर्षी 45 कोटींचा जादा महसूल जमा होणार आहे. शहराच्या चारही बाजूंनी मोठ-मोठे गृहप्रकल्प उभारले जात आहेत. शहरात 17 विभागीय करसंकलन कार्यालये आहेत. यामध्ये वाकड, चिखली, मोशी, किवळे, चर्‍होली, थेरगाव, सांगवी, भोसरी, दिघी-बोपखेल या कार्यालय परिसरात मिळकतीवाढीचा वेग जास्त आहे. शहराची लोकसंख्या 30 लाखांच्या पुढे गेली आहे.

शहरात सन 2017 मध्ये 4 लाख 50 हजार 761 मिळकती होत्या. पाच वर्षांत ती संख्या 6 लाख 2 हजार 203 मिळकतींवर गेली आहे. पाच वर्षांत तब्बल 1 लाख 51 हजार 461 मिळकती वाढल्या आहेत. तर, एक एप्रिल ते 31 मे या दोन महिन्यांच्या कालावधीत नवीन 4 हजार 974 मिळकतींची नोंद झाली आहे. नव्या मिळकती या बहुतांश निवासी असून, त्या सदनिका, घरे, रो-हाऊस आहेत. त्यावरून शहरात घरांची संख्या झपाट्याने वाढत असल्याचे स्पष्ट होत आहे. त्यामुळे भविष्यात पालिकेच्या उत्पन्नात मिळकतकर स्वरूपात उत्पन्नात मोठी वाढ होणार आहे. गेल्या सन 2023-24 या आर्थिक वर्षात 817 कोटींचा मिळकतकर जमा झाला होता.

तब्बल 50 हजार मिळकतींची अद्याप नोंद नाही

करसंकलन विभागाच्या सर्व सेवा ऑनलाइन केल्या आहेत. त्यामुळे विभागाचे मनुष्यबळ हे अधिकाधिक कर आकारणीकडे वळविण्यात आले आहे. शहरात आजही किमान 50 हजार मिळकतींची नोंद झालेली नाही. नवीन सर्वंकष सर्वेक्षणाच्या माध्यमातून वाढीव, नवीन मिळकती कराच्या कक्षेत आणल्या जातील. शहराचे निव्वळ तीन झोनमध्ये वर्गीकरण केले गेले आहे, ते बदलून शहरात मायक्रो झोनिंग करण्यात येणार आहे. त्यामुळे समन्यायी व पारदर्शी करप्रणाली लागू करता येईल, असे सहायक आयुक्त नीलेश देशमुख यांनी सांगितले.

सर्वेक्षणातून शहरातील सर्व मिळकतींची माहिती उपलब्ध होणार

शहरातील प्रशस्त रुंद रस्ते, उद्याने, क्रीडांगणे, इतर मूलभूत सोयीसुविधा यामुळे नागरिक पिंपरी-चिंचवड शहराला पसंती देत आहेत. वाढत्या लोकसंख्येला पुरेसा पाणीपुरवठा करणे व शहराचा शाश्वत विकास ही दोन आव्हाने सध्या पालिकेसमोर आहेत. त्यांनाच प्राधान्य देऊन काम केले जाईल. नवीन सर्वेक्षणाच्या माध्यमातून करसंकलन विभागाबरोबर नियोजनासाठी अन्य आवश्यक माहिती संकलित करण्याचा प्रयत्न आहे, असे महापालिकेचे आयुक्त शेखर सिंह यांनी सांगितले.

मिळकतींचा प्रकार

निवासी -5 लाख 17 हजार
बिगरनिवासी- 55 हजार
औद्योगिक- 4 हजार 100
मोकळ्या जागा -10 हजार 500
मिश्र -15 हजार 900

हेही वाचा

SSC Result : नाशिक विभागाचा निकाल घसरला, राज्यात आठव्या क्रमांकावर

अहमदनगर : धावत्या वाहनातून गॅस गळती

लोणावळा : राजमाचीच्या जंगलात लुकलुकणार्‍या काजव्यांची चांदण्यांशी स्पर्धा

Back to top button