SSC Result : नाशिक विभागाचा निकाल घसरला, राज्यात आठव्या क्रमांकावर | पुढारी

SSC Result : नाशिक विभागाचा निकाल घसरला, राज्यात आठव्या क्रमांकावर

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक मंडळाकडून मार्च २०२३ मध्ये घेण्यात आलेल्या माध्यमिक शालांत प्रमाणपत्र अर्थात इयत्ता दहावीच्या लेखी परीक्षेचा निकाल शुक्रवारी (दि. २) ऑनलाइन पद्धतीने जाहीर झाला. नाशिक विभागीय मंडळाचा निकाल ९२.२२ टक्के इतका लागला. गतवर्षीच्या तुलनेत यंदा निकाल ३.६८ टक्क्यांनी कमी लागल्याने नाशिक विभाग राज्यात आठव्या क्रमांकावर फेकला गेला. विभागात जळगाव जिल्ह्याने ९३.५२ टक्क्यांसह बाजी मारली, तर नाशिक जिल्हा ९१.१५ टक्क्यांसह विभागात शेवटच्या स्थानी राहिला आहे.

इयत्ता दहावीच्या लेखी परीक्षा दि. २ ते २५ मार्च या कालावधीत पार पडल्या. या परीक्षेसाठी नाशिक विभागातून १ लाख ९४ हजार ५४७ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. या परीक्षेस १ लाख ९२ हजार ७५४ विद्यार्थी प्रविष्ट झाले होते. त्यापैकी तब्बल १ लाख ७७ हजार ७७६ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. उत्तीर्णांमध्ये ९४ हजार ३६० मुलांचा, तर ८३ हजार ४१६ मुलींचा समावेश आहे. संपूर्ण विभागात मुलींचा निकाल ९४.४४ टक्के, तर मुलांचा निकाल ९०.३५ टक्के लागला. मुलींनी टक्केवारी ४.०९ ने बाजी मारत संपूर्ण निकालात वर्चस्व गाजवले.

नंदुरबार जिल्ह्यात ९३.४१ टक्के, तर धुळे जिल्ह्यात ९२.२४ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले. संपूर्ण विभागातील ६७ हजार ६०२ विद्यार्थी विशेष प्रावीण्यासह प्रथम श्रेणीत, ६८ हजार ७० विद्यार्थी प्रथम श्रेणीत, ३५ हजार ३९३ विद्यार्थी द्वितीय श्रेणीत, तर ६ हजार ७११ विद्यार्थी उत्तीर्ण श्रेणीत पास झाले आहेत. दरम्यान, दहावीच्या परीक्षेत विभागात ७० गैरमार्ग प्रकरणे निदर्शनास आली होती. त्यामध्ये नाशिक जिल्ह्यातील २९, धुळे जिल्ह्यातील १६, जळगाव जिल्ह्यातील ६, तर नंदुरबार जिल्ह्यातील १६ विद्यार्थ्यांचा समावेश आहे. या विद्यार्थ्यांची संपादनूक रद्द करण्यात आली आहे.

 

जिल्हानिहाय निकाल

नाशिक – ९१.१५

धुळे – ९२.२४

जळगाव – ९३.५२

नंदुरबार – ९३.४१

हेही वाचा :

Back to top button