लोणावळा : राजमाचीच्या जंगलात लुकलुकणार्‍या काजव्यांची चांदण्यांशी स्पर्धा | पुढारी

लोणावळा : राजमाचीच्या जंगलात लुकलुकणार्‍या काजव्यांची चांदण्यांशी स्पर्धा

लोणावळा(पुणे) : सध्या काजव्यांचा मोसम सुरू आहे. मावळ परिसरातील तसेच लोणावळ्याच्या आजूबाजूच्या जंगलात हे काजवे रात्रीच्या वेळी लुकलुक करीत निसर्गाच्या सौंदर्यात भर घालत आहेत. त्यामुळे हे लुकलुकणारे काजवे बघण्यासाठी हौशी ट्रेकर्स तसेच काजवाप्रेमी या ठिकाणी मोठ्या प्रमाणात गर्दी करू लागले आहेत.

रात्रीच्या वेळी काजव्यांचे थवेच्या थवे लोणावळ्याजवळ असणार्‍या राजमाची या ठिकाणी काजव्यांचे थवेच्या थवे दिसू लागले आहेत. त्यामुळे राजमाचीच्या जंगलात सध्या या काजवाप्रेमींची जत्राच भरत आहे. लोणावळ्यापासून काही अंतरावर असलेल्या डेला अ‍ॅडव्हेंचरच्यापुढे राजमाची रस्त्याने गेल्यास उजव्या हाताला पटेल डॅम म्हणून एक छोटे धरण लागते. या धरणाच्या परिसरात काही प्रमाणात काजवे आढळून येतात; पण पुढे राजमाची किल्ला परिसरातील गावात गेल्यावर त्याठिकाणच्या जंगलातही मोठ्या संख्येने काजवे बघायला मिळतात.

तुंग किल्ला परिसरातही काजवे

सह्याद्रीमध्ये अनेक प्रकारच्या प्रजातींचे काजवे आढळून येतात. पण पाऊस पडायला सुरुवात झाली की ते सर्व नाहीसे होतात. मे महिन्याच्या शेवटास किंवा जूनच्या पहिल्या आठवड्यात लाखोंच्या संख्येने काजवे चमकताना दिसत आहेत. काजवे जूनच्या मध्यानंतर नाहीसे होतात. जिथे जंगल आहे अशा ठिकाणी आपण गेलो तर काजवे दिसून येतात. लोणावळ्याच्या आजूबाजूचे जंगल, राजमाची, मुळशी, भांबर्डे गाव, घनगड किल्ला जंगल परिसर आदी ठिकाणी काजवे नक्की आढळतात. त्याव्यतिरिक्त पवन मावळात तुंग किल्ला परिसर या ठिकाणी काजवे दिसून येतात.

काजव्यांच्या दोन हजारपेक्षा अधिक प्रजाती

काजवा हा असा एकच जीव आहे की, जो स्वयंप्रकाशमान आहे. खरं तर काजवे जगभर आढळतात. तरीही त्यांचे अब्जावधींच्या संख्येने वास्तव्य उष्णकटीबंधीय प्रदेशात असते. जगभरात वैज्ञानिकांस काजव्यांच्या 2000 पेक्षा जास्त प्रजाती आजतागायत सापडल्या आहेत. साधारणपणे जिथे मुबलक प्रमाणात पाणी, जंगल आणि मोठाले वृक्ष असतील, अशा वातावरणामध्ये काजवे वाढतात. समागमानंतर काही दिवसांनी, मादी काजवा अंडी घालते. ही अंडी जमिनीमध्ये किंवा जमिनीच्या अगदी थोडेसे खाली लपवली जातात. अंदाजे 3 ते 4 आठवड्यात, या अंड्यांमधून अळी बाहेर येतात. या अळ्या म्हणजेच भविष्यातील काजवे. एखाद्या अळईचे काजव्यामध्ये रुपांतर झाल्यावर मात्र काजवे पानेफुले फुलातील परागकण इत्यादी खातात.

हेही वाचा

अंटार्क्टिकाच्या जीवघेण्या थंडीत राहतात 4 हजार लोक!

अहमदनगर, शिर्डी लोकसभेवर काँग्रेसचा दावा

कोल्हापुरात उद्या पहिले नांगरट साहित्य संमेलन

Back to top button