नाशिक : “त्या’ मुलांच्या प्रवासाचे गूढ कायम, तपासाचा अहवाल बालकल्याण समितीकडे | पुढारी

नाशिक : "त्या' मुलांच्या प्रवासाचे गूढ कायम, तपासाचा अहवाल बालकल्याण समितीकडे

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

बिहारमधून महाराष्ट्रात आणलेल्या ५९ मुलांच्या जबाबाचा अहवाल सोमवारी (दि.१) बालकल्याण समितीकडे सुपूर्द करण्यात आला आहे. या अहवालाच्या आधारे समिती पुढील निर्णय घेणार आहे. दरम्यान, या मुलांच्या प्रवासासाठी त्यांच्या पालकांनी प्रत्येकी एक हजार रुपये दिल्याचे तपासात समोर आले आहे. सर्व मुले गरीब कुटुंबातील असल्याचेही प्राथमिक तपासात उघड झाले. त्यामुळे या मुलांना महाराष्ट्रात नेमके कोणत्या कारणासाठी आणले याचा शोध घेतला जात आहे.

रेल्वे सुरक्षा बल आणि लोहमार्ग पोलिसांनी मंगळवारी (दि.३०) दानापूर-पुणे एक्स्प्रेसमधून ८ ते १५ वयोगटातील ५९ मुलांची सुटका केली. पुणे येथील मदरशात नेण्याच्या बहाण्याने बिहारमधील पूर्णिया जिल्ह्यातून महाराष्ट्रातील सांगली जिल्ह्यात या मुलांची तस्करी होत असल्याचे समोर आले. या कारवाईत जळगाव येथे २९ व मनमाड येथे ३० मुलांना उतरवण्यात आले. या प्रकरणी पाच संशयितांना अटक केली आहे. बालकल्याण समितीच्या आदेशानुसार या मुलांचा अहवाल करण्यात आला. त्यात मुलांकडून मिळालेली माहिती संकलित करून त्यांना महाराष्ट्रात का आणले जात होते याचा तपास केला जात आहे. तर दुसरीकडे रेल्वे पोलिसही अटक केलेल्या संशयितांकडे चौकशी करीत आहेत.

या मुलांपैकी अनेकांची जन्मतारीख एकच असल्याचे समोर येत आहे. त्यामुळे मुलांना राज्यात आणण्यामागील ठोस कारण शोधण्याचे आवाहन यंत्रणेसमोर आहे. ताब्यात असलेल्या मुलांपैकी एक मुलगा १८ वर्षीय असल्याचे समजते. तसेच मुलांच्या पालकांचे संपर्क क्रमांकही मिळाल्याने पोलिसांमार्फत त्यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला जात असल्याचे सूत्रांनी सांगितले.

हेही वाचा :

Back to top button