पृथ्वीप्रमाणे गुरूच्या आसमंतातही चमकते वीज | पुढारी

पृथ्वीप्रमाणे गुरूच्या आसमंतातही चमकते वीज

वॉशिंग्टन : आपल्या ग्रहमालिकेतील सर्वात मोठा ग्रह म्हणजे गुरू. निव्वळ वायूचा गोळा असलेला हा ग्रह काही बाबतीत आपल्या पृथ्वीसारखाही आहे. ‘नासा’च्या ‘जुनो’ अंतराळयानाकडून मिळालेल्या ताज्या डेटानुसार गुरू ग्रहाच्या आसमंतातही पृथ्वीप्रमाणेच विजा लखलखतात. याबाबतची एक प्रतिमाही प्रसिद्ध करण्यात आली आहे. संशोधकांनी म्हटले आहे की या प्रतिमेत गुरूला आच्छादित करणार्‍या करड्या रंगाच्या अमोनिया ढगांखाली पृथ्वीवर असतात तसेच पाण्याचे ढगही लपलेले आहेत. पृथ्वीप्रमाणेच या ढगांमध्येही वीज निर्माण होते.

‘जुनो’च्या रेडियो रिसिव्हरद्वारे मिळालेल्या हाय-रिझोल्युशन डेटानुसार पाच वर्षांमध्ये या अंतराळयानाने गुरूभोवती भ्रमण करीत असताना अनेक गोष्टींची नोंद केली. यानाला दिसून आले की गुरूवरील वीजनिर्मितीची प्रक्रिया एका समान लयीबरोबर स्पंदित होते, जी पृथ्वीवरील ढगांमध्येही आढळते. या विजांचा लखलखाटही गुरूवर दिसून येतो.

पृथ्वीप्रमाणेच एक मिलीसेकंदाच्या अंतराने या विजा चमकतात. अशा विजा या पृथ्वीवर नैसर्गिकरीत्या आढळणारा सर्वात शक्तिशाली विद्युतस्रोत आहे. झेक अ‍ॅकॅडमी ऑफ सायन्सेजचे वैज्ञानिक इवाना कोलमासोवा यांनी सांगितले की विजा चमकणे हा एक असा इलेक्ट्रिक डिस्चार्ज आहे जो ढगांचा गडगडाट सुरू झाला की सुरू होतो. ढगांमध्ये बर्फ आणि पाण्याच्या कणांच्या धडकेतून ते विद्युतभारीत होतात.

Back to top button