दोन हजाराच्‍या नोटा रद्दमुळे Bank nifty तेजी अनुभवणार? जाणून घ्‍या तज्ज्ञ काय म्‍हणतात… | पुढारी

दोन हजाराच्‍या नोटा रद्दमुळे Bank nifty तेजी अनुभवणार? जाणून घ्‍या तज्ज्ञ काय म्‍हणतात...

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : दोन हजार रुपयांच्या नोटा चलनातून मागे घेण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय रिझर्व्ह बँकेने घेतला आहे. या नोटा बँकांमध्‍ये जमा करण्यासाठी ३० सप्टेंबरपर्यंत मुदत देण्यात आली आहे. याचे परिणाम कोणत्‍या क्षेत्रावर होणार यावर आता चर्चा सुरु झाली आहे. दरम्‍यान, या निर्णयामुळे बँक निफ्टीमध्ये (Bank nifty) वाढ होण्याची शक्यता असून सार्वजनिक क्षेत्रातील बँकिंग शेअर तेजी अनुभवतील, असे मत शेअर बाजारातील तज्ज्ञ व्‍यक्‍त करत आहे.

Bank nifty : बँकांमधील ठेवींची संख्या वाढणार

शेअर बाजारातील तज्ज्ञांचे मतानुसार, दोन हजार रुपयांच्या नोट बंदी हे एक सकारात्‍मक पाऊल आहे. कारण त्यामुळे टियर-2 आणि टियर-3 शहरांमधील ठेवींची संख्या वाढू शकते. (सरकारच्‍या मते ५० हजार ते एक लाख लोकसंख्‍येच्‍या श्रेणतील शहरे टियर २ तर २० हजार ते ५० हजार लोकसंख्‍या असलेली शहरे टियर ३ म्‍हणून वर्गीकृत आहेत.) टियर-2 आणि टियर-3 शहरांमधील बँकांमधील ठेवींची संख्या वाढणार आहे. यामुळे बँकिंग शेअर्समध्ये तेजी पाहायला मिळू शकते. सध्याच्या काळात, सार्वजनिक आणि खाजगी बँकांच्‍या कामगिरीमुळे बँकिंग क्षेत्राला सकारात्‍मक संकेत आहेत.

सध्या बँकिंग शेअर अत्यंत महत्त्वाच्या पातळीवर उभा राहिला आहे. शुक्रवारच्या सत्रात तो ४४,०००च्या पातळीवर बंद झाला. अशा परिस्थितीत बँक निफ्टी ( Bank nifty) आगामी काळात नवीन उंची गाठू शकेल, असे तज्ज्ञांचे मत आहे.

बँकांमधील Liquidity वाढू शकते

2000 च्या नोटा बंद केल्याने बँकांमधील तरलता (Market Liquidity) वाढू शकते. स्टेट बँक ऑफ इंडिया , बँक ऑफ बडोदा , पंजाब नॅशनल बँक, पंजाब आणि सिंध बँक, बँक ऑफ महाराष्ट्र, कॅनरा बँक आणि बँक ऑफ इंडिया सारख्या सर्व सार्वजनिक क्षेत्रातील बँकांचे निकाल चौथ्या तिमाहीत बँकांची स्थिती चांगली आहे. त्‍यामुळे आता दोन हजार रुपयांच्‍या नोटा बंदीचा निर्णयामुळे बँकांमधील ठेवी वाढतील यांचा फायदा बँकिंग शेअर्समध्‍ये पाहायला मिळेल, अशी शक्‍यता शेअर बाजारातील तज्ज्ञ व्‍यक्‍त करत आहेत.

हेही वाचा : 

 

 

Back to top button