नाशिक : पुलाचा कठडा तोडून पिकअप थेट रेल्वे ट्रॅकवर | पुढारी

नाशिक : पुलाचा कठडा तोडून पिकअप थेट रेल्वे ट्रॅकवर

नाशिक (इगतपुरी) : पुढारी वृत्तसेवा
मुंबई-आग्रा महामार्गावरील बोरटेंभे शिवारात रेल्वे पुलावरून जाणारे पिकअप वाहन हे पुलाचा कठडा तोडून थेट रेल्वे ट्रॅकवर आले. नेमके याचवेळी भुसावळ-इगतपुरी मेमू गाडी येत होती. मात्र, येथे असलेल्या रेल्वे कर्मचार्‍याने गाडीला लाल झेंडा दाखवित तो मेमूच्या दिशेने पळत सुटला. त्यामुळे मेमूचालकाने गाडी थांबविल्याने मोठा अनर्थ टळला.

शनिवारी (दि. 13) मालुंजे (ता. इगतपुरी) येथील पिकअप वाहन (एमएच 15, जीव्ही 4694) मुंबई येथे फुले पोहोचवून दुपारी 3 च्या सुमारास येत असताना, बोरटेंभे येथे वाहनचालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने महामार्गावरील रेल्वे पुलाचे संरक्षक कठडे तोडून पिकअप वाहन थेट 35 फूट खोल रेल्वे ट्रॅकवर येऊन आदळले. याच वेळी भुसावळहून इगतपुरीकडे मेमू एक्स्प्रेस येत होती. मात्र, याप्रसंगी येथे हजर असलेल्या सात ते आठ रेल्वे कर्मचार्‍यांनी प्रसंगावधान राखत लाल झेंडा दाखवून गाडी थांबविल्याने मोठी जीवितहानी टळली. घटनास्थळी रेल्वे कर्मचारी, रेल्वे सुरक्षा पथक, लोहमार्ग पोलिस, इगतपुरी पोलिस यांनी धाव घेत रेल्वे ट्रॅकवरील पिकअप वाहन बाजूला केले. या अपघातात दोन जण जखमी झाले असून, त्यांना जगद्गुरू नरेंद्राचार्य मोफत रुग्णवाहिकेतून इगतपुरी ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. रेल्वे कर्मचार्‍यांनी भुसावळकडून येणारी रेल्वे एक्स्प्रेस थांबविली नसती तर मोठी जीवितहानी झाली असती, अशी माहिती प्रत्यक्षदर्शींनी दिली.

हेही वाचा:

Back to top button