पुढारी ऑनलाईन डेस्क : अमेठी आणि रायबरेलीचा तिढा काँग्रेसने अखेर शेवटच्या क्षणी सोडवला. काँग्रेस नेते राहुल गांधी त्यांच्या आई सोनिया गांधी यांचा पारंपारिक मतदारसंघ असलेल्या रायबरेलीतून लोकसभा लढणार आहेत. काँग्रेसने शुक्रवारी याची घोषणा केली. तर दीर्घकाळ सोनिया गांधींचे प्रतिनिधी राहिलेले किशोरीलाल शर्मा अमेठीतून लढणार आहेत. दरम्यान, काँग्रेसच्या या घोषणेनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi) यांनी राहुल गांधी (Rahul Gandhi) यांच्यावर निशाणा साधला. आगामी लोकसभा निवडणुकीचा निकाल स्पष्ट असल्याचा दावा पीएम मोदी यांनी शुक्रवारी केला. राहुल गांधी वायनाड व्यतिरिक्त नवीन जागा शोधत असल्याचे त्यांनी यापूर्वी सांगितले होते. याची आठवणही त्यांनी यावेळी करून दिली. (Lok Sabha Elections 2024)
पश्चिम बंगालमधील बर्धमान-दुर्गापूर येथील प्रचारसभेत संबोधित करताना पीएम मोदी म्हणाले की, "या निवडणुकीचा निकाल स्पष्ट आहे. कोणत्याही ओपिनियन पोलची गरज नाही. हे मी आधीच सांगितले होते, 'शहजादे' (राहुल गांधी) वायनाडमधून हारण्याच्या भीतीने त्यांच्यासाठी दुसरी सीट शोधत आहेत. आता त्यांना अमेठीतून पळून जाऊन रायबरेलीची सीट निवडावी लागली. हे लोक दिशाभूल करुन सर्वांना सांगतात की, घाबरू नका! मीदेखील त्यांना हेच सांगतो, घाबरू नका! पळून जाऊ नका."
काँग्रेसला पूर्वीपेक्षा कमी जागा मिळतील. हे लोक निवडणुका जिंकण्यासाठी लढत नसून केवळ देशाचे विभाजन करण्यासाठी निवडणुकीच्या मैदानाचा वापर करत आहेत, हे आता देशालाही कळू लागले आहे, अशा शब्दांत त्यांनी काँग्रेसवर हल्लाबोल केला.
मी गेल्या १० दिवसांपासून काँग्रेसला सातत्याने तीन आव्हाने देत आहे, पण ते मौन बाळगून बसले आहेत. माझे पहिले आव्हान हे आहे की काँग्रेस आणि INDIA आघाडीने देशाला लेखी विश्वास द्यावा की ते धर्माच्या आधारावर आरक्षणाबाबत संविधानात कोणताही बदल करणार नाहीत. माझे दुसरे आव्हान आहे, देशाला लेखी वचन द्यावे की ते एससी/एसटी आणि ओबीसींचे आरक्षण हिसकावून ते धर्माच्या आधारावर कोणालाही देणार नाहीत. माझे तिसरे आव्हान आहे की ज्या राज्यात त्यांचे सरकार आहे तिथे ओबीसी कोटा कमी करून मुस्लिमांना धर्माच्या आधारे आरक्षण दिले जाणार नाही, हे त्यांनी लेखी आश्वासन द्यावे, असे आव्हान त्यांनी काँग्रेसला दिले.
पीएम मोदी यांनी यावेळी पश्चिम बंगालमधील ममता बॅनर्जी यांच्या नेतृत्त्वाखालील तृणमूल सरकारवरही निशाणा साधला. बंगालमधील तृणमूल सरकारने हिंदूंना दुय्यम दर्जाचे नागरिक बनवले. हे कसले लोक आहेत ज्यांचा जय श्री रामच्या जयघोषालाही आक्षेप आहे? त्यांचा राम मंदिराच्या उभारणीवर आक्षेप आहे. रामनवमीच्या मिरवणुकीवर त्यांचा आक्षेप आहे, असा आरोप पीएम मोदी यांनी केला.
हे ही वाचा :