दारूड्या मुलाचा लग्नासाठी तगादा; कंटाळून बापाने केला खून | पुढारी

दारूड्या मुलाचा लग्नासाठी तगादा; कंटाळून बापाने केला खून

तासगाव : पुढारी वृत्तसेवा : दारूड्या मुलाने लग्नासाठी लावलेल्या तगाद्याला कंटाळून बापाने केलेल्या मारहाणीत मुलाचा मृत्यू झाला. विशाल गुलाब मंडले ( वय १८, रा. जरंडी) असे मुलाचे नाव आहे. गुलाब भगवान मंडले (५२) असे बापाचे नाव आहे. पोलिसांनी गुलाब याला अटक केली.

या प्रकरणी मृत विशाल यांची आई सुनीता यांनी फिर्याद दाखल केली. हा खून ९ मे रोजी रात्री झाला. मात्र मुलाने स्वत: जीवन संपवल्याचा बनाव करून त्याच्यावर अंत्यसंस्कार केले. संशयित गुलाब यांचा मुलगा विशाल यास दारूचे व्यसन होते. तो काही काम नव्हता. विशाल याने बुधवारी वडील गुलाब यांच्याकडे लग्नासाठी तगादा लावला. विशाल यास दारूचे व्यसन असल्याने लग्न लवकर जुळून येत नव्हते. याच कारणावरून ९ मे रोजी रात्री दोघांत जोरदार वाद झाला. विशाल दारूच्या अंमलाखाली असल्याने वाद वाढतच गेला. विशाल यास गुलाब याने एचटीपी पाईपने मारहाण केली. पाईपचा एक फटका विशालच्या गुप्तांगावर बसला. त्याचा जागेवरच मृत्यू झाला. गुलाब याने बनाव करून विशालने आत्महत्या केली, असे सर्वांना सांगितले.

गुलाबने विशाल हा चक्कर येऊन पडला आहे, असे भावास सांगितले. त्याला दवाखान्यात घेऊन जाऊया असे म्हणून त्याला मोटरसायकल वरून दवाखान्यात घेऊन गेले. पण विशाल याचा मृत्यू झाला होता. त्यानंतर रात्रीच गडबडीत अंत्यसंस्कार करण्यात आले. शुक्रवारी रक्षाविसर्जन होते. यापूर्वी गुलाब याने पत्नी सुजाता हिस खरी घटना सांगितली. यानंतर खुनाचा प्रकार उघडकीस आला.
दरम्यान, गुलाब मंडले याने मुलगा विशाल याचा खून करून अंत्यसंस्कार घाईगडबडीत केले असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. रक्षाविसर्जनाच्या वेळीच पोलिस निरीक्षक भानुदास निंभोरे आणि त्यांच्या पथकाने जरंडी येथे धाव घेतली. मृत विशाल यांच्या मृत्यूबाबत कुटुंबियाकडे कसून चौकशी केली. त्यानंतर वडील गुलाब मंडले यांनी खून केल्याची कबुली दिली. संशयित गुलाब याला तासगाव पोलिसांनी ताब्यात घेऊन अटक केली.

Back to top button